अहमदाबाद : गुजरातमध्ये नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांआधी भाजप आणि काँग्रेसनं जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. मागच्या ३० दिवसांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी तीनवेळा तर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी दोन वेळा गुजरात दौऱ्यावर गेले आहेत. यावेळी १८२ विधानसभा जागांपैकी १५० जागा जिंकण्याचं लक्ष्य भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी ठेवलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुजरात निवडणुकांमधले सगळे रेकॉर्ड मोडण्यासाठी भाजपनं मिशन १५०+चं लक्ष्य ठेवलं आहे. १९८५मध्ये काँग्रेसनं माधवसिंग सोळंकींच्या नेतृत्वात १४९ जागा जिंकल्या होत्या. सोळंकींचं हे रेकॉर्ड अजून भाजपला तोडता आलेलं नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हा भाजपनं १२० जागा जिंकल्या होत्या. आता नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत, म्हणून भाजप १५० जागा जिंकण्याचा विश्वास भाजपनं व्यक्त केला आहे.


२०१४ साली लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशच्या ८० जागांपैकी भाजपनं ७३ जागा जिंकल्या होत्या. त्यावेळी तब्बल ३२५ विधानसभेच्या जागांवर भाजपला आघाडी मिळाली होती. त्यानंतर २०१७मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीतही भाजपला जवळपास तेवढ्याच जागा मिळाल्या. लोकसभा निवडणुकीवेळी भाजपला गुजरातमध्ये २६ जागांवर यश मिळालं होतं. उत्तर प्रदेशचं हेच गणीत भाजपनं गुजरातमध्येही लावल्यामुळे १५० जागा जिंकण्याचं लक्ष्य भाजपनं ठेवलं आहे.