कॉंग्रेससोबत नातं नाही, पण आरक्षणाची मागणी त्यांना मान्य - हार्दिक पटेल
पाटीदार अमानत संघर्ष समितीचे नेते हार्दिक पटेल यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिक स्पष्ट केली.
अहमदाबाद : पाटीदार अमानत संघर्ष समितीचा नेते हार्दिक पटेल यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिक स्पष्ट केली. यावेळी बोलताना हार्दिक पटेल यांनी सांगितले की, त्यांची आरक्षणाची मागणी कॉंग्रेसने मान्य केली आहे. सत्तेवर येताच कॉग्रेस आरक्षणावर प्रस्ताव आणेल’.
यासोबतच ते म्हणाले की, काही वर्गांना प्रमाणापेक्षा जास्त आरक्षण देण्यात आलं आहे. अशात सर्व्हे करून ज्यांना आरक्षणाची गरज आहे, त्यांना आरक्षण दिलं जाईल. आमच्या मागण्या गुजरातच्या हिताच्या आहेत. पाटीदार समाजाला शिक्षण, नोक-या हव्यात. पाटीदारांना नियमानुसार ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण दिलं जाऊ शकतं. कॉंग्रेससोबत कोणतंही नातं नाहीये, पण त्यांनी आमच्या मागण्या मान्य केल्या. कॉंग्रेसला आम्ही तिकीट मागितलं नाही, आम्हाला आरक्षण हवंय.
भाजपवर जोरदार टीका
यावेळी बोलताना हार्दिक पटेल यांनी भाजपवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, भाजप आमचे उमेदवार खरेदी करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांनी २०० कोटी खर्च करून अपक्ष उमेदवारांना मैदानात उतरवलं आहे. आमची भाजप विरोधात कोणतीही लढाई नाहीये, पण त्या विरोधात लढाई लढणे गरजेचे आहे.
मी गुजरातचा एजंट...
कॉंग्रेसचा एजंट बनल्याच्या आरोपावर हार्दिक पटेल यांनी उत्तर दिले की, मी गुजरातचा एजंट आहे. मी ना कॉंग्रेसमध्ये आहे. ना पुढचे अडीच वर्ष कोणत्या पक्षात जाणार. यावेळी हार्दिक पटेल यांनी स्पष्टपणे कॉंग्रेसला समर्थन दिल्याचे सांगितले नाही. पण भाजप विरोधात लढत असल्याचा उल्लेख केलाय.
कॉंग्रेससोबत सौदेबाजी नाही
कॉंग्रेसबाबत बोलताना हार्दिक पटेल म्हणाले की, आम्ही त्यांच्यासोबत कोणताही सौदा केला नाहीये. त्यांनी आमची आरक्षणाची मागणी मान्य केलीये. याउलट भाजपने आमच्या स्वाभिमानावर हल्ला केलाय. यासोबत त्यांनी स्पष्ट केलंय की, ते कोणत्याही पक्षाच्या बॅनरखाली प्रचार करणार नाही.
कॉंग्रेसचं समर्थन
हार्दिक पटेल म्हणाले की, आम्ही कधीही लोकांना कॉंग्रेसला समर्थन देण्याचं सांगितलं नाही. पण ते आमच्या हिताचा विचार करत आहेत. त्यामुळे हे काम आम्ही जनतेवर सोडत आहोत. कॉंग्रेस लवकरच आपल्या घोषणापत्रात आरक्षणाचा फॉर्म्य़ूला सादर करणार आहे.