पती `बाह्मण` नसल्यानं पत्नीनं पोलिसांत गुन्हा केला दाखल
आपल्या कुटुंबीयांसोबत या महिलेनं पतीविरुद्ध एफआयआर दाखल केलीय
अहमदाबाद : गुजरातच्या एका महिलेनं आपल्या पतीनं आपल्याला 'ब्राह्मण' असल्याचं सांगत लग्न केलं... त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचा गुन्हा दाखल केलाय. ही महिला २३ वर्षांची आहे... मुख्य म्हणजे या महिलेनं तिच्या पतीसोबत प्रेमविवाह केलाय. महिलेच्या आरोपानुसार, पतीनं लग्नापूर्वी आपल्याला खोटी जात सांगितली होती. तो 'ब्राह्मण' नसल्याचं आपल्याला लग्नानंतर समजल्याचं या महिलेनं म्हटलंय.
ही महिला गुजरातच्या मेहसाणा जिल्ह्यातल्या बेचराजी तालुक्यातील आदिवाड गावची रहिवासी आहे. शाहपूर पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेल्या तक्रारीमध्ये महिलेनं आपलं २३ एप्रिल रोजी झाल्याचं म्हटलंय.
'मालक ज्योत्स्ना मेहता यांच्या एका कंपनीत काम करत असताना आपली ओळख त्यांच्या मुलाशी म्हणजेच यशशी झाली. यशनं मला तो ब्राह्मण असल्याचं सांगितलं. ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं... आणि यशही माझ्याप्रमाणे सवर्ण वर्गातला असल्यानं आम्ही हिंदू परंपरेनुसार खानपूरच्या स्टर्लिंग सेंटरमध्ये एका पुजाऱ्याच्या साक्षीनं विवाह केला. त्यानंतर विवाहाचं रजिस्ट्रेशनही केलं...' असं या महिलेनं आपल्या तक्रारीत म्हटलंय.
लग्नानंतर काही दिवसांनी यशचं आडनाव मेहता नसून खमार असल्याचं आपल्याला समजलं... त्यानं माझा विश्वासघात केला... अशी या महिलेची तक्रार आहे. आपल्या कुटुंबीयांसोबत या महिलेनं पतीविरुद्ध एफआयआर दाखल केलीय.