Morbi Latest Update: गुजरातमधील मोरबी इथे मच्छू नदीवरील झुलता पूल कोसळल्यामुळे 132 जणांचा बळी गेला. रविवारी संध्याकाळी साडेसहा वाजता हा पूल कोसळला. ज्यानंतर तातडीनं बचावकार्य हाती घेत नदीतून मृतदेह बाहेर काढण्याचं काम सुरू करण्यात आलं. आत्तापर्यंत 137  जणांचे मृतदेह नदीतून बाहेर काढले गेले आहेत. सुरुवातीला या दुर्घटनेमध्ये 90 हून अधिकजणांचा मृत्यू ओढावल्याची माहिती समोर आली होती. ज्यानंतर आता हा आकडा 132 वर पोहोचल्याचं कळत आहे. 


अधिक वाचा : गुजरातमध्ये कोसळलेल्या 140 वर्ष जुना पूलाचा इतिहास काय? पाहा कोणत्या राजाने बांधला होता पूल?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सदर दुर्घटनेमध्ये मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे. आताच्या घडीला 2 जण बेपत्ता असल्याचं सांगण्यात येत असून, बचाव कार्य शेवटच्या टप्प्यात असल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर पूल ऑपरेटर अंजता अरेव्हा या कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा पूल चार दिवसांपूर्वीच दुरूस्तीनंतर खुला करण्यात आला होता. पूल कोसळला तेव्हा त्या पुलावर मोठ्या प्रमाणात महिला आणि मुलं होती. पूल कोसळण्याआधी अनेकजण या पुलावर नाचत होते, उड्या मारत होते, तसंच काही जण पुलाच्या मोठमोठ्या वायर्स खेचत होते असं एका प्रत्यक्षदर्शीने सांगितलं. 




पुलावर मोठी गर्दी झाल्यामुळे पूल कोसळला असावा असा अंदाज व्यक्त केला जातोय. दरम्यान, गुजरात सरकारने प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पाच सदस्यीय समिती स्थापन केली आहे.