मुंबई : एकिकडे लोकसभा निवडणूकांचं वातावरण रंगात येत असतानाच दुसरीकडे राजकीय पटवलावर चर्चेत असणारा एक चेहरा लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याचं वृत्त समोर आलं आहे. पाटीदार समाजाच्या नेतेपदी असणाऱ्या हार्दिक पटेल याच्या विवाहसोहळ्याच्या बऱ्याच चर्चांनी सध्या जोर धरला आहे. २७ जानेवारी रोजी हार्दिक विवाहबंधनात अडकणार असून, दोन दिवस त्याच्या विवाह सोहळ्याची धूम असणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बालपणीची मैत्रीण किंजल पारेख हिच्यासोबत हार्दिक लग्नाच्या बेडीत अडकणार असून, वडील भारत पटेल आणि खास मित्र निखिल सावनी यांनी त्याच्या लग्नाच्या वृत्तास दुजोरा दिला. 


'इंडियन एक्स्प्रेस'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार किंजल आणि हार्दिक हे बऱ्याच काळापासून एकमेकांना ओळखत असून, त्यांच्या वयात दोन वर्षांचं अंतर आहे. हार्दिक २५ वर्षांचा असून, किंजल त्याच्याहून दोन वर्षांनी लहान आहे. हा आंतरजातीय विवाह नसून, किंजलही पटेल, पाटीदार समाजातील असल्याची माहिती हार्दिकच्या वडिलांनी दिली. अहमदाबादच्या चंदन नगरी या गावातील एकाच भागामध्ये हे दोघंही राहात असून, त्यांचे कुटुंबीयसुद्धा एकमेकांच्या ओळखीचे असल्याचं सांगितलं जात आहे. 


किंजल ही वाणिज्य शाखेची पदवीधारक असून सध्या ती वकिलीचं शिक्षण घेत आहे. दरम्यान, लग्नाच्या या वृत्ताविषयी अद्यापही हार्दिककडून कोणतीच माहिती देण्यात आलेली नाही. त्याच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार हार्दिकचा विवाहसोहळा ऊंझा येथे असणाऱ्या उमिया धाम येथे पार पडावा अशी त्याच्या कुटुंबीयांची इच्छा होती. पण, न्यायालयाने ऊंझा येथे हार्दिकच्या प्रवेशास बंदी घातल्यामुळे आता हा विवाहसोहळा  सुरेंद्रनगर जिल्ह्यातील येथील दिगसार या गावात पार पडणार आहे. मुख्य म्हणजे लग्नसोहळा हा अत्यंत खासगी आणि छोटेखानी स्वरुपात पार पडणार असून, मोजक्याच मंडळींची या सोहळ्याला उपस्थिती असणार आहे.