सुरत : गुजरात निवडणुकांसाठीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. सुरतमधल्या लिंबायत जागेवरची लढत रोमांचक होणार आहे. मराठी बहुल अशा या जागेवर भाजपनं संगीता पाटील यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर पहिले काँग्रेस मग भाजप आणि आता परत काँग्रेसमध्ये गेलेल्या डॉ. रवींद्र पाटील लिंबायत मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार आहेत. पण डॉ. रवींद्र पाटील यांच्या वेबसाईटवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो लावण्यात आला आहे. एवढच नाही तर भाजपसाठी मतदान करा, असं आवाहनही करण्यात आलं आहे. 


डॉ. रवींद्र पाटील यांनी २०१२मध्ये भाजपकडून तिकीट मागितलं होतं पण संगीता पाटील यांच्याबरोबर समेट झाल्यानंतर रवींद्र पाटील यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. 



यानंतर रवींद्र पाटील यांनी भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसनं तिकीट द्यायचं आश्वासन दिल्यामुळे रवींद्र पाटील यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचं तेव्हा बोललं गेलं. आणि आता त्यांनाच काँग्रेसनं उमेदवारी दिली.



डॉ. रवींद्र पाटील यांनी नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी वेबसाईट बनवली. या वेबसाईटला रवींद्र पाटील यांनी अपडेटच केलं नाही. वेबसाईटवर काँग्रेसचे उमेदवार असणारे पाटील भाजपमध्ये आहेत. एवढच नाही तर वेबसाईटवर पाटील भाजपसाठी मत मागतायत. वेबसाईटवर पाटील यांनी दोन्ही पक्षांची निवडणूक पोस्टर टाकली आहेत.