गुजरातमधील दुसऱ्या टप्प्यातील प्रचार, मोदी घेणार सी-प्लेनचा आधार
गुजरातमध्ये दुस-या आणि अखेरच्या टप्प्यातील मतदानासाठी प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत. दरम्यान, मोदींनी सी-प्लेनचा आधार घेऊन प्रचार करायचे ठरवलं आहे.
अहमदाबाद : गुजरातमध्ये दुस-या आणि अखेरच्या टप्प्यातील मतदानासाठी प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत. प्रचाराच्या अखेरच्या दिवशी भाजप आणि काँग्रेससह सगळेच पक्ष थेट मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतील. दरम्यान, मोदींनी सी-प्लेनचा आधार घेऊन प्रचार करायचे ठरवलं आहे.
सी-प्लेननं प्रवास
दुस-या टप्प्याच्या प्रचाराच्या अखेरच्या दिवशी पंतप्रधान मोदींचा झंझावात पाहायला मिळेल. सकाळी साडे नऊ वाजता मोदी साबरमती नदी ते मेहसाणाच्या धरोई धरणापर्यंत सी-प्लेननं प्रवास करणार आहेत. धरोई इथं उतरल्यानंतर मोदी अंबाजींचं दर्शन घेतील आणि तिथून पुन्हा अहमदाबादला परतणार आहेत.
रोड शोला परवानगी नाही!
मंगळवारी भाजपच्यावतीने मोदींच्या रोड शोचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव मोदी, राहुल गांधी आणि हार्दिक पटेल यांच्या रोड शोला परवानगी नाकारण्यात आली होती. त्यामुळेच आता मोदींनी सी-प्लेनचा आधार घेऊन प्रचार करायचे ठरवलं आहे.
ट्विट करुन मोदींनी याबाबतची माहिती दिली आहे. तर तिकडे राहुल गांधी अहमदाबादमध्ये पत्रकार परिषद घेणार आहेत. अखेरच्या टप्प्यात ९३ जागांसाठी १४ डिसेंबरला मतदान होणार आहे.