काँग्रेसचा `तो` नेता मुस्लीम पत्नीच्या इशाऱ्यावर नाचतो; अनंतकुमार हेगडेंची जीभ पुन्हा घसरली
कोणी हिंदू मुलीचा हात पकडत असेल तर ते हात छाटले पाहिजेत.
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि वरिष्ठ नेत्यांनी वारंवार तंबी देऊनही भाजपमधील वाचाळवीर काही सुधारायला तयार नाहीत. केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांच्या जाहीर सभेत केलेल्या वक्तव्यामुळे याचा पुन्हा एकवार प्रत्यय आला. कर्नाटकमधील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष दिनेश राव यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना हेगडे यांची जीभ भलतीच घसरली. मी दिनेश राव यांच्या प्रश्नांची उत्तरे द्यायला तयार आहे. मात्र, त्यांना प्रथम काही गोष्टींचा खुलासा करावा. कारण, माझ्या माहितीनुसार हा व्यक्ती स्वत:च्या मुस्लिम पत्नीच्या इशाऱ्यावर नाचतो, असे हेगडे यांनी म्हटले. साहजिकच हेगडे यांच्या या वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण झाला. अनेकांनी सोशल मीडियावरून त्यांना ट्रोल केले.
कर्नाटकच्या कोडगु जिल्ह्यात रविवारी हेगडे यांची जाहीर सभा झाली. त्यावेळी हेगडे यांनी अनेक आक्षेपार्ह वक्तव्ये केली. त्यांनी म्हटले की, आपल्याला समाजाची प्राथमिकता ठरवायला हवी. कोणी हिंदू मुलीचा हात पकडत असेल तर ते हात छाटले पाहिजेत, असे त्यांनी म्हटले. तसेच यावेळी हेगडे यांनी आग्रा येथील ताजमहालाच्या संदर्भात अजब दावाही केला. ताजमहाल हा मुसलमानांनी बांधला नव्हता. खुद्द शहाजानने आपल्या आत्मचरित्रात ताजमहाल राजा जयसिंग यांनी बांधल्याचे स्पष्ट केले आहे. ताजमहाल हे मुळात एक शिवमंदिर असल्याचा दावा हेगडे यांनी केला होता.
हेगडे यांच्या भाषणानंतर काँग्रेस नेते दिनेश राव यांनी ट्विट करून या सगळ्याचा निषेध केला. त्यांनी म्हटले की, खासदार किंवा मंत्री म्हणून तुम्ही काय कामगिरी केली आहे? कर्नाटकच्या विकासात तुमचे किती योगदान आहे? अशा लोकांना खासदार किंवा मंत्रीपद देणे ही खूपच निराशादायक गोष्ट आहे, असे दिनेश राव यांनी सांगितले होते.