Gym Trainer Death: स्टेरॉयड घेऊन व्यायाम करताय? जिम ट्रेनरच्या मृत्यूने खळबळ
हसतं खेळतं कुटुंब एका क्षणात उद्ध्वस्त... जिम ट्रेनरच्या मृत्यून उपस्थित झाले अनेक प्रश्न
Gym Trainer Death: आपली शरिरयष्टी (Body shape) पिळदार करण्यासाठी काही तरूण हे तासनतास जीममध्ये व्यायाम (Exercise) करतात. पण व्यायामासाठी मार्गदर्शनाची गरज भासते. व्यायाम करताना कोणती काळजी घ्यावी, कोणता आहार घ्यावा, स्टेरॉयड्स घेणं किती धोकादायक ठरू शकतं का? याविषयी मार्गदर्शन महत्त्वाचं असतं.
पण अनेकजण याकडे दुर्लक्ष करतात. पण हेच दुर्लक्ष जीवघेणं ठरु शकतं. बनावट फूड सप्लीमेंट (Food supplement) आणि स्ट्रेरॉयड्स (Steroids) घेतल्याने एका जीम ट्रेनरचा (Gym trainer) मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशमधल्या (Uttar Pradesh) मेरठ (Meerut) इथं राहणाऱ्या जिम ट्रेनर संजीव धामा (Sanjeev Dhama) याच्या मृत्यूने एकच खळबळ उडाली आहे. पत्नी, दोन मुली आणि वृद्ध आई-वडिल असं संजीवचं कुटुंब आहे. पण संजीवच्या मृत्यूने एका क्षणात हे हसतं खेळतं कुटुंब उद्ध्वस्त झालं आहे.
संजीव धामा यांच्यावर दिल्लीच्या एम्समध्ये (Delhi AIIMS) उपचार सुरु होते. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. शव विच्छेदन अहवालात (Post Mortem Report) संजीवचा बनावट फूड सप्लीमेंट आणि स्टेरॉयड्सचं (Duplicate Food supplement and Steroids) अधिक प्रमाणात सेवन केल्याने मृत्यू झाल्याचं नोंदवण्यात आलं आहे. बनावट फूड सप्लिमेंट आणि स्टेरॉयड्स विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी अनेकवेळा कारवाई केली आहे. पण त्यानंतरही असे प्रकार घडतच आहेत.
कोण होता संजीव धामा?
मेरठमधल्या राजनगर कॉलनी इथं रहाणारा संजीव धामा सेंट्रल मार्केटमध्ये असलेल्या एका जिममध्ये ट्रेनर होता. त्याच्या पत्नीने दिलेल्या माहितीनुसार 13 ऑगस्टला संजीवच्या पोटात अचानक दुखू लागलं. त्याला डॉक्टरकडे नेण्यात आलं. सुरुवातीला त्याला खाण्यातून काही त्रास झाला असेल म्हणून उपचार करण्यात आले. पण यानंतरही त्याच्या पोटातलं दुखणं वाढतच चाललं होतं. अनेक रुग्णालयात त्याच्यावर उपचार करण्यात आले, अखेर त्याला दिल्लीत्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तब्बल 28 दिवस त्याच्यावर उपचार सुरु होते. पण अखेर त्याची मृत्यूशी झुंज संपली.
संजीव घेत होता स्टेरॉड्स
फिट राहण्यासाठी संजीव धामा फूड सप्लीमेंट आणि स्टेरॉयड्स घेत होता. पण तेच त्याच्या मृत्यूचं कारण ठरेलं असं त्याने स्वप्नातही विचार केला नव्हात. संजीव घेत असलेलं स्टेरॉयड बनावट असल्याचं समोर आलं आहे. संजीव मेरठमधल्या खैरनगर इथून फूड सप्लीमेंट आणि स्टेरॉयड्स विकत घेत असे. या दुकानातून पोलिसांनी बनावट उत्पादनं जप्त केली आहेत.
मुलींसाठी पाहिली होती स्वप्न
संजीव याला जिम ट्रेनर म्हणून मोठं नाव कमवायचं होतं. आपलं एक अलिशान घर असावं, आपल्या दोन्ही मुलींनी चांगलं शिक्षण घ्यावं अशी स्वप्न त्याने पाहिली होती. पण आता ही स्वप्न अपूर्णच राहिली आहे. दोन मुली आणि वृद्ध आई-वडिलांची जबाबदारी आता संजीवच्या पत्नीवर येऊन पडली आहे.
पत्नीने सोशल मीडियावर मागितली मदत
संजीवची आर्थिक परिस्थिती फारशी ठिक नव्हती. आता तर त्याच्या जाण्याने कुटुंबावर आभाळ कोसळलं आहे. संजीवची पत्नी आराधना हिने सोशल मीडियाच्या माध्यमातून मदतीचा हात मागितला आहे. तसंच बनावट फूड सप्लीमेंट आणि स्टेरॉयड्स विकणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी तिने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे केली आहे. आपलं कुटुंब उद्ध्वस्त झालं, यापुढे अशा आणखी घटना घडू नयेत असं तिला वाटतं.
स्टेरॉयड्सचं जास्त प्रमाण ठरू शकतं जीवघेणं
स्टेरॉयड्सचं प्रमाणापेक्षा जास्त सेवन जीवघेणं ठरु शकतं असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. स्टेरॉयड्स घेऊन बनवण्यात आलेली शरीरयष्टी केवळ बाहेरून चांगली दिसते. प्रत्यक्षात आतून स्ट्रेरॉयड्स शरीर पोखरत असतं. त्याने हाडंही कमकुवत होण्याची भीती असते. याशिवाय शुगर आणि हाय ब्लड प्रेशरचाही धोका उद्भवू शकतो असं तज्ज्ञ सांगतात. व्यायाम करणं चांगलं पण त्यासाठी योग्य आहार आणि योग्य मार्गदर्शनाची गरज असल्याचं आवाहन तज्ज्ञांनी केलं आहे.