बंगळुरू: राफेल विमान खरेदी व्यवहारामुळे प्रतिमा डागाळलेल्या हिंदुस्थान एरॉनॉटिक्स लिमिटेडने (HAL) अत्याधुनिक लढाऊ हेलिकॉप्टरची निर्मिती करून आपल्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. HAL ने विकसित केलेले हे हेलिकॉप्टर हवेतून हवेत (एअर टू एअर) क्षेपणास्त्राचा मारा करु शकते. या हेलिकॉप्टरमधून डागलेले क्षेपणास्त्र आकाशातील धावत्या लक्ष्याचाही अचूक वेध घेऊ शकते. हवेतून हवेत मारा करणारे हे पहिलेच स्वदेशी बनावटीचे हेलिकॉप्टर आहे. याशिवाय, हे लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टर (एलसीएच) २० एमएमची टुरेट गन आणि ७० एमएम रॉकेटसने सुसज्ज आहे. सध्याच्या घडीला भारतीय लष्कराच्या ताफ्यात असलेल्या कोणत्याही हेलिकॉप्टरमध्ये ही सुविधा नाही. त्यामुळे या हेलिकॉप्टरच्या समावेशाने भारतीय सैन्याची ताकद वाढणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

HALच्या विमानांनी कारगिलमध्ये पराक्रम गाजवला, तरीही मोदींनी डावलले- राहुल गांधी


एवढेच नव्हे तर कितीही उंचीवर असताना हे हेलिकॉप्टर पूर्ण क्षमतेने आपली कामगिरी पार पाडू शकते. अशी क्षमता असणारे हे जगातील एकमेव लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टर असल्याचा दावाही HAL ने केला आहे.
 
 राफेल विमान खरेदी व्यवहारात ऑफसेट भागीदार म्हणून HAL ची निवड न झाल्यामुळे विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली होती. विमाननिर्मितीचा इतक्या वर्षांचा अनुभव असलेल्या HAL ला डावलून अनिल अंबांनी यांच्या रिलायन्स डिफेन्स या नवख्या कंपनीला हे कंत्राट देण्यात आले होते. यानंतर काही दिवसांतच HAL च्या कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी कंपनीला कर्ज उचलावे लागल्याची माहितीदेखील समोर आली होती. या सगळ्या वादामुळे HAL ची प्रतिमा काहीशी डागाळली होती. HAL ने यापूर्वी मिग-२१, मिग-२३, मिग-२७, मिग-२९, जग्वार आणि मिराज-२००० अशा विमानांची निर्मिती केली होती. या विमानांनी कारगिल युद्धात मोठा पराक्रम गाजवला होता.