नवी दिल्ली: आपण बांगलादेशमधील जनतेला भारतीय नागरिकत्व देऊ केले तर अर्धा बांगलादेश रिकामा होईल, असे वक्तव्य केंद्रीय गृहमंत्रालयाचे राज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी केले. ते रविवारी दिल्लीत पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलत होते. यावेळी रेड्डी यांनी म्हटले की, भारताने बांगलादेशी लोकांना नागरिकत्व द्यायचे ठरवले तर बांगलादेशमधील अर्धी जनता स्वत:चा देश सोडेल. पण मग या सगळ्यांची जबाबदारी कोण घेणार? के.चंद्रशेखर किंवा राहुल गांधी यांच्यासारखे नेते ही जबाबदारी घ्यायला तयार आहेत का, असा सवाल यावेळी रेड्डी यांनी विचारला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी रेड्डी यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रेशखर राव यांना नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA)देशविरोधी कसा आहे, हे सिद्ध करण्याचे आव्हानही दिले. चंद्रशेखर राव यांच्यासारखे नेते घुसखोरांना नागरिकत्व देण्याची मागणी करतात. त्यांच्याकडून CAA कायद्याला विरोध केला जातो. मात्र, देशातील १३० कोटी जनतेपैकी एका व्यक्तीलाही या कायद्याचा त्रास होणार असेल तर केंद्र सरकार CAAविषयी पुनर्विचार करायला तयार आहे. मात्र, केवळ पाकिस्तानी आणि बांगलादेशींच्या भल्यासाठी आम्ही तसे करणार नाही, असे जी. किशन रेड्डी यांनी ठणकावून सांगितले. 


राज ठाकरे यांचा सीएए/एनआरसीला जाहीर पाठिंबा


CAA नुसार पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशात धार्मिक अत्याचार सहन कराव्या लागणाऱ्या लोकांना मानवतेच्या दृष्टीकोनातून भारतीय नागरिकत्व देण्यात येणार आहे. मात्र, काही राजकीय पक्ष या देशांतील मुस्लिम नागरिकांनाही भारताचे नागरिकत्व देण्याची मागणी करत आहेत. मात्र, घुसखोर किंवा निर्वासितांना तशी सवलत देता येणार नाही, असे रेड्डी यांनी स्पष्ट केले.