मुंबई : देशात उद्यापासून सोने विक्री करताना गोल्ड हॉलमार्किंग  (सोने शुद्धता प्रमाणपत्र) अनिवार्य असणार आहे. १५ जून २०२१ पासून देशभरातील ज्वेलर्संना १४, १८ आणि २२ कॅरेटच्या सोन्याच्या वस्तू विकण्याची परवानगी देण्यात येणार आहे. हे नियम सरकारने मागील काही वर्षापूर्वी केले होते. पण कोरोना संकटामुळे लागू करण्यात आले नव्हते. आता मात्र उद्यापासून म्हणजेच १५ जून २०२१ पासून देशात त्याची अंमलबजावणी सुरू होईल. हॉलमार्किंगचा नियम सोन्याची विक्री करणाऱ्यांसाठी लागू असेल. ग्राहक त्यांच्याकडे असलेलं सोने विक्री हॉलमार्कशिवाय करु शकतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या देशात विक्री होणार्‍या सोन्याच्या दागिन्यांपैकी केवळ ४० टक्के दागिने हॉलमार्क (सोने शुद्धता प्रमाणपत्र) चिन्हांकित केले जातात. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या म्हणण्यानुसार, सध्या भारतातील सुमारे ४ लाख ज्वेलर्सपैकी फक्त ३५,८७९ ज्वेलर्स (भारतीय मानक ब्युरो) प्रमाणित आहेत. 



सरकारच्या म्हणण्यानुसार, गेल्या पाच वर्षांत हॉलमार्किंग केंद्रांमध्ये २५ टक्के वाढ झाली आहे. देशभरात हॉलमार्किंगची अंमलबजावणी करण्याच्या निर्णयाची घोषणा सरकारने नोव्हेंबर २०१९ मध्ये केली होती. १५ जानेवारी २०२१ ची मुदत दोनदा वाढवावी लागली. यापूर्वी सरकारने एक जूनसाठी अंतिम मुदत दिली होती, पण कोरोनाच्‍या दुसर्‍या लाटेमुळे ही मूदत आणखी दोन आठवडे वाढविण्‍यात आली होती. 


भविष्यातील सोन्याच्या खरेदीवर असा पडणार प्रभाव 
१) १५ जूनपासून भारतीय ज्वेलर्स केवळ १४,१८ आणि २२ कॅरेटच्या सोन्याचे दागिने उत्पादनांची विक्री करतील.
२) दागिने हॉलमार्क नोंदणी प्रक्रिया ऑनलाईन केली आहे.
३) अनिवार्य हॉलमार्किंगमुळे ग्राहकांचे कमी कॅरेटच्या दागिने फसवणूकीपासून संरक्षण होणार आहे.
४) ग्राहकांसाठी, १८ कॅरेट प्रमाणित सोने खरेदी करणे म्हणजे वस्तूच्या २४ कॅरेटपैकी १८ भाग शुद्ध सोन असेल.


ग्राहक हॉलमार्क केलेले सोने ओळखू शकतात
१) बीआयएस मार्क
२) कॅरेट आणि शुध्दता शुद्धता : २२, १८ आणि १४ कॅरेट
३) हॉलमार्किंग केंद्राचे ओळखचिन्ह  आणि क्रमांक असेल
४) खरेदी केलेल्‍या सोन्‍यावर ज्वेलरचा ओळखचिन्ह आणि क्रमांक असेल


ग्राहक म्हणून आपण हॉलमार्क केलेले केवळ सोन्याचे दागिने खरेदी करणे आवश्यक आहे. अनिवार्य हॉलमार्किंगद्वारे, ग्राहकांना दागिन्यांची खात्री दिली जाऊ शकते. त्या दागिन्यांवर हॉलमार्कनूसार शुद्धतेची हमी दिली जाते.