मुंबईचा रहिवासी हामिद अन्सारीची पाककडून सुटका, वाघा बॉर्डरवर स्वागत
पाकिस्तानमधील गुप्तचर संस्थांनी २०१२ मध्ये हामिद अन्सारीला अटक केली होती.
नवी दिल्ली - गेल्या सहा वर्षांपासून पाकिस्तानमधील कारागृहात असलेल्या हामिद अन्सारी यांची अखेर आज सुटका करण्यात आली. वाघा बॉर्डरवरून हामिद अन्सारी मंगळवारी भारतात आला. पाकिस्तानमधील गुप्तचर संस्थांनी २०१२ मध्ये हामिद अन्सारीला अटक केली होती. बनावट पाकिस्तानी ओळखपत्र बाळगल्याच्या आरोपावरून २०१५ मध्ये पाकिस्तानमधील लष्करी न्यायालयाने त्याला तीन वर्षांची शिक्षा सुनावली होती. ३३ वर्षीय हामिद अन्सारी मुळचा मुंबईचा रहिवासी असून, तो गेल्या तीन वर्षांपासून पेशावरच्या कारागृहात शिक्षा भोगत होता. १५ डिसेंबरला त्याची शिक्षा संपल्यानंतर त्याला सोडण्यात आले. त्यानंतर सोमवारीच त्याला भारतात परत पाठवण्याची तयारी पाकिस्तानमध्ये करण्यात आली होती.
हामिद अन्सारी याच्या सुटकेचे भारताने स्वागत केले आहे. अन्सारी याच्याप्रमाणे पाकिस्तानमधील कारागृहात असलेल्या आणि शिक्षा पूर्ण झालेल्या इतर भारतीय कैद्यांचीही लवकर सुटका करून त्यांना मायदेशी परत पाठवावे, अशी मागणी परराष्ट्र मंत्रालयाने केली आहे.