उपोषणाच्या ९व्या दिवशी हार्दिक पटेलनं मृत्यूपत्र बनवलं
पाटीदार नेता हार्दिक पटेल अनिश्चित काळासाठी उपोषणाला बसला आहे.
अहमदाबाद : पाटीदार नेता हार्दिक पटेल अनिश्चित काळासाठी उपोषणाला बसला आहे. आरक्षण आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी हार्दिक पटेलचं उपोषण सुरु आहे. उपोषणाच्या ९व्या दिवशी रविवारी त्यानं मृत्यूपत्र बनवलं आहे. या मृत्यूपत्रात हार्दिकनं आई-वडिल, एक बहिण, २०१५ साली कोटा आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या १४ युवकांचं कुटुंब, आपल्या गावातील आजारी गायींचा आश्रय असलेलं ठिकाण यांच्यामध्ये संपत्ती वाटली आहे.
मृत्यूनंतर हार्दिक पटेलनं डोळे दान करण्याचा निर्णय घेतला आहे. २५ ऑगस्टपासून हार्दिक पटेल उपोषणाला बसला आहे. तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, आरजेडी या पक्षांच्या नेत्यांनी आणि प्रतिनिधींनी हार्दिक पटेलची भेट घेतली आहे. पण भाजप सरकारनं अजून कोणताही हस्तक्षेप केलेला नाही.
हार्दिक पटेलची प्रकृती ढासळत आहे. त्यानं मागच्या ९ दिवसांपासून काहीच खाल्लं नाही. मागच्या ३६ तासांपासून त्यानं पाणीही प्यायलं नाही, असं वक्तव्य पाटीदार अनामत आंदोलन समितीचे प्रवक्ते मनोज पनारा यांनी केलं आहे. डॉक्टरांनी हार्दिकला रुग्णालयात दाखल व्हायचा सल्ला दिला आहे. हार्दिकचा रक्तदाप सामान्य आहे, पण त्यानं रक्ताची चाचणी करायला नकार दिला आहे.