हरियाणात विनेश फोगाटसमोर `लेडी खली`चं आव्हान, कोण आहे ही WWE रेसलर?
Julana Vidhan Sabha: हरियाणा विधानसभा निवडणुकीत जुलाना मतदारसंघाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. या मतदारसंघात काँग्रेसने विनेश फोगाटला तिकिट बाजी मारली. तर भाजपने पायलट यांना उमेदवारी देत निवडणूक चुरशीची केली.
WWE Wrestler Kavita Vs Vinesh Phogat : हरियाणा विधानसभा निवडणुकीत जुलाना मतदारसंघाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये 50 किलो वजनी गटात अंतिम फेरीपर्यंत धडक मारणाऱ्या विनेश फोगाटने (Vinesh Phogat) कुस्तीला रामराम करत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. याचं फळही तिला लगेच मिळालं. काँग्रेसने विनेशचं सासर असलेल्या जुलाना मतदारसंघातून विधानसभेचं तिकिट देत मास्टरस्ट्रोक मारला. पण भाजपने कॅप्टन योगेश बैरागी (Yogesh Bairagi) यांना उमेदवारी देत चुरस निर्माण केलीय. कॅप्टन योगेश बैरागी हे एका मोठ्या एअरलाईन्स कंपनीत पायलट होते. चेन्नई पूरपरिस्थितीत त्यांनी बचावकार्यात भाग घेतला होता.
आपचा 'जोर का धक्का'
जुलाना मतदारसंघात काँग्रेस आणि भाजपमध्ये काँटे कि टक्कर होणार असं वाटत असतानाच आपनेही 'जोर का धक्का' दिला आहे. काँग्रेसबरोबर आघाडी करण्याचे प्रयत्न संपल्यानंतर आपने जुलाना मतदारसंघातून लेडी खली म्हणून ओळखली जाणारी WWE रेसलरला विधानसभेचं तिकिट दिलं आहे.
कोण आहे लेडी खली?
लेडी खली म्हणून प्रसिद्ध असलेल्या या WWE रेसलरचं नाव कविता दलाल (Kavita Dalal) आहे. कविता जींदची रहिवसी आहे. तिचं लग्न उत्तर प्रदेशमधल्या बागपतमध्ये झालं. अमेरिकेत डब्ल्यूडब्ल्यूई संघात तिची निवड झाली. दुबईत झालेल्या WWE स्पर्धेत सहभागी होणारी ती एकमेव भारतीय स्पर्धक होती. या स्पर्धेत कविताने पंजाबी सूट परिधान करत रेसलिंग केलं. भारतीय संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी तीने भारतीय पोषाख परिधान केला होता. यामुळे तिला चांगलीच प्रसिद्धी मिळाली. 2017 मध्ये तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी कवितला 'फर्स्ट लेडी पुरस्कारा'ने सन्मानित केलं होतं.कविता लेडी खली म्हणूनही ओळखली जाते.
जुलानात चुरशीची लढत
कविता हरियाणा विधानसभा निवडणूक 2024 मध्ये जुलाना मतदारसंघात भारताची महिला कुस्तीपटू विनेश फोगाटला टक्कर देईल. अरविंद केजरीवाल यांच्या कामामुळे प्रभावित झाल्याचं सांगत कविता दलालने 2022 मध्ये आम आदमी पार्टीत प्रवेश केला होता. मतांचं समीकरण? जुलाना मतदारसंघात 1 लाख 73 हजार 645 मतदार आहेत. यात 81 हजार जाट मतदार आहेत. त्यामुळे जाट मतदारांचं मत महत्त्वाचं ठरणार आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर ओबीसी मतदार येतात. जुलाना मतदारसंघ जिंद जिल्ह्यातील हाय प्रोफाईल लढत मानली जाते. गेल्या तीन विधानसभा निवडणुकीत या जागेवर काँग्रेसला अपयश आलं आहे. आता विनेश फोगाट काँग्रेसच्या वियजाचा हा दुष्काळ संपवणार का याकडे लक्ष लागलं आहे.