रामराजे शिंदे, झी मीडिया, नवी दिल्ली: संसदेच्या प्रांगणातील महात्मा गांधीजींच्या पुतळ्यासमोर निलंबनाच्या कारवाईविरोधात आंदोलन करणाऱ्या खासदारांना अगदी सकाळी चहा घेऊन जाणारे राज्यसभेचे उपसभापती हरिवंश नारायण सिंह हेदेखील आता उपवास करणार आहेत. आज सकाळी उपसभापतींनी खासदारांना चहा नेऊन दिल्याने काहीतरी सकारात्मक घडेल, अशी आशा होती. मात्र, निलंबित खासदारांनी आपण आंदोलन सुरुच ठेवणार असल्याचे जाहीर केले होते. यानंतर उपसभापती हरिवंश नारायण सिंह यांनीही आपण एक दिवसाचा उपवास करणार असल्याचे जाहीर केले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संसदेबाहेर रात्रभर आंदोलन करणाऱ्या खासदारांसाठी सकाळी उपसभापतीच चहा आणतात तेव्हा....


तसेच हरिवंश नारायण सिंह यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनाही पत्र लिहले आहे. या पत्रात त्यांनी रविवारी राज्यसभेत झालेल्या गोंधळाविषयी खंत व्यक्त केली आहे. निलंबित खासदारांनी संसदेत लोकशाहीचे वस्त्रहरण केले. २० सप्टेंबरला राज्यसभेत खासदारांनी केलेल्या वर्तनामुळे संसदेची प्रतिमा मलीन झाली आहे. लोकशाहीच्या नावाखाली हिंसक आंदोलन करण्यात आले. उपसभापतींना भयभीत करण्यात आले, तसेच संसदेच्या नियमांचे उल्लंघनही करण्यात आले, असे हरिवंश नारायण सिंह यांनी पत्रात म्हटले आहे. त्यामुळे आता सत्ताधारी आणि विरोधकांमधील हा वाद आणखीनच चिघळण्याची शक्यता आहे.



राज्यसभेत गोंधळ घातल्याप्रकरणी आठ खासदारांवर निलंबनाची कारवाई


राज्यसभेत रविवारी दोन वादग्रस्त कृषी विधेयके मंजूर करण्यात आली. तेव्हा सभागृहाची सूत्रे उपसभापती हरिवंश नारायण यांच्याकडे होती. त्यांनी कृषी विधेयकांवर आवाजी मतदान घेण्याचा निर्णय जाहीर केला. तेव्हा विरोधी पक्षाच्या खासदारांनी सभागृहाच्या वेलमध्ये येत गोंधळ घातला. तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी तर उपसभापती हरिवंश नारायण यांच्यासमोरील नियमपुस्तिका फाडली, तसेच माईकही उखाडण्याचा प्रयत्न केला. यानंतर राज्यसभेतील वातावरण प्रचंड तापले होते.