हे कसं शक्य आहे? आई आणि मुलाचं वय 40 वर्ष, तर मुलीचं वय 34 वर्ष
हरियाणामधल्या एका कुटुंबात हा प्रकार घडला आहे, कसा तो वाचा
हरियाणा : आई आणि मुलाचं वय सारखंच आहे असं जर तुम्हाला कोणी सांगतिलं तर कदाचित तुम्हाला धक्का बसेल, हे कसं शक्य आहे असा विचारही तुम्ही कराल. आता तुम्ही म्हणाल की महिलेचं दुसरं लग्न असेल आणि मुलगा सावत्र असेल. पण असं जराही नाहीए. हरियाणामधल्या एका कुटुंबात हे प्रत्यक्षात घडलं आहे. या कुटुंबात आई आणि मुलाचं वय सारखंच म्हणजे 40 आहे आणि मुलीचं वय 34 वर्ष इतकं आहे
नेमका प्रकार काय आहे?
ही घटना हरियाणामधली आहे. हरियाणामध्ये नागरिकांना कौटुंबिक ओळखपत्र (Family Identity Card) दिलं जात आहे. पण हे ओळखपत्र तयार करताना अनेक चुका झाल्याचं समोर येत आहे. आई-मुलाचं वय एक सारखंच असल्याची कमालही या चुकीचा एक भाग आहे. फरीदाबादमध्ये राहणाऱ्या डॉक्टर निष्ठा गुप्ता यांच्या कुटुंबात पती, दोन मुली आणि एक मुलगा आहे.
डॉक्टर निष्ठा गुप्ता यांना देण्यात आलेल्या ओळखपत्रात आकड्यांचा मोठा घोळ घालण्यात आला आहे. जेव्हा डॉ. निष्ठा गुप्ता जेव्हा यांच्या हातात ओळखपत्र पडलं तेव्हा त्यांना धक्काच बसला. या ओळखपत्रात 44 वर्षांच्या डॉ. निष्ठा गुप्ता यांचं वय 40 दाखवण्यात आलं आहे तर 17 वर्षांच्या मुलीचं वय 34 वर्ष दाखवण्यात आलं आहे. अल्पवयीन मुलाचं वय चक्क 40 वर्ष इतकं नोंदवण्यात आलं आहे. यापेक्षाही धक्कादायक म्हणजे डॉ. निष्ठा गुप्ता यांच्या पतीचं ओळखपत्रात नावच नाहीए.
हरियाणा सरकारने (Hariyana Government) राज्यातील 54 लाख कुटुंबांना 8 अंकी कौटुंबिक ओळखपत्र देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यासाठी ब्लॉक लेव्हल ऑफिसर्स (BLOs) घरोघरी जाऊन कुटुंबांचा डेटा गोळा करून जिल्हा स्तरावरील माहिती केंद्रांना देत आहेत. या डेटाच्या आधारावर, MeraParivar.Haryana.Gov.in या पोर्टलवर कुटुंबांचा डेटा अपडेट केला जात आहे.
या ओळखपत्राच्या आधारे राज्यातील जनतेला राज्य सरकारच्या 56 सरकारी योजनांचा लाभ मिळणार असल्याचे सरकारने जाहीर केले आहे. म्हणूनच राज्यातील लोक कौटुंबिक ओळखपत्र बनवण्यासाठी खूप उत्सुक आहेत, पण ही ओळखपत्र सध्या लोकांसाठी डोकेदुखी ठरत आहेत.