नवी दिल्ली : केंद्रातल्या मोदी सरकारमधून एनडीए घटकपक्षातला आणखी एक मंत्री राजीनामा देणार आहे. केंद्र सरकारच्या कृषी सेवा करार विधेयक २०२०ला विरोध म्हणून शिरोमणी अकाली दलाच्या नेत्या आणि केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल राजीनामा देणार आहेत. शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीर सिंग बादल यांनी लोकसभेमध्ये हरसिमरत कौर बादल यांच्या राजीनाम्याबाबत सांगितलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कृषी उपज व्यापार आणि वाणिज्य (संवर्धन आणि सुविधा) विधेयक २०२० आणि कृषी(सशक्तीकरण आणि संरक्षण) किंमत आश्वासन करार आणि कृषी सेवा कारार विधेयक २०२० वरच्या चर्चेत भाग घेताना सुखबीर सिंग बादल म्हणाले 'शिरोमणी अकाली दल शेतकऱ्यांचा पक्ष आहे आणि शेती संबंधी या विधेयकांचा आम्ही विरोध करतो.'


लोकसभेमध्ये काँग्रेसने केलेल्या आरोपांना फेटाळून लावत आम्ही कधीही यू-टर्न घेतला नसल्याचंही सुखबीर सिंग बादल म्हणाले. आम्ही एनडीएमधले साथीदार आहोत. आम्ही सरकारला शेतकऱ्यांबाबतची भावना सांगितली. या विषयाला आम्ही प्रत्येक मंचावर उपस्थित केलं. शेतकऱ्यांच्या शंका दूर व्हाव्यात यासाठी आम्ही प्रयत्न केले, पण तसं झालं नाही, असं वक्तव्य सुखबीर सिंग बादल यांनी केलं. 


पंजाबच्या शेतकऱ्यांनी अन्नधान्याच्या बाबतीत देशाला आत्मनिर्भर करण्यात महत्त्वाचं योगदान दिलं आहे. पंजाबमध्ये सरकारने शेतीवर आधारित ढाचा तयार करण्यासाठीचं कठीण काम केलं, पण हा अध्यादेश आपल्या ५० वर्षांचं काम संपवत असल्याची भीती सुखबीर सिंग बादल यांनी व्यक्त केली. 


हरसिमरत कौर बादल या मोदी सरकारमध्ये अन्न प्रक्रिया मंत्री आहेत. शिरोमणी अकाली दलाचा एनडीएमध्ये हरसिमरत कौर बादल या एकमेव मंत्री आहेत. अकाली दल एनडीएमधला भाजपचा सगळ्यात जुना साथीदार आहे.