हनुमान चालिसा म्हणत आधी पूजा केली, नंतर दानपेटी फोडून चोरले हजारो रुपये; Video Viral
Haryana Crime : हरियाणाच्या रेवाडी जिल्ह्यातील हनुमान मंदिरात चोरीची घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले असता त्यांना धक्काच बसला. चोरट्याने हनुमान चालिसाचे पठण करून हनुमाच्या चरणी 10 रुपये अर्पण करुन हजारो रुपये घेऊन पळ काढला.
Crime News : हरियाणाच्या (haryana Crime) रेवाडी जिल्ह्यातून चोरीची एक विचित्र घटना समोर आली आहे. एका चोरट्याने मंदिरात चोरी करण्यापूर्वी हनुमान चालिसाचे (hanuman chalisa) पठण केले आणि दानपेटीत 10 रुपयेही ठेवले. यानंतर त्याने दानपेटी फोडून रक्कम चोरून चोरट्याने पळ काढला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून चोरट्याचा शोध सुरु आहे. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात (CCTV) कैद झाला आहे. मंदिराच्या (hanuman temple) पुजाऱ्याच्या तक्रारीच्या आधारे सेक्टर-6 पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी चोरट्याने किती रक्कम चोरली हे स्पष्ट झालेले नाही.
हरियाणातील रेवाडी येथील एका मंदिरातून दानपेटी फोडून पैसे चोरण्यात आले होती. मात्र सीसीटीव्ही तपासले असता सगळा प्रकार समोर आला. चोरीची संपूर्ण घटना मंदिरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. रेवाडीच्या धरुहेडा शहरातील पंचमुखी हनुमान मंदिराशी हा सगळा प्रकार घडला होता. 9 जुलै रोजी रात्री एक चोरट्याने हनुमान चालिसा पठण केल्यानंतर मंदिरातील दानपेटीवर डल्ला मारला. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. मात्र, चोरीच्या या पद्धतीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
सीसीटीव्ही फुटेजनुसार, आरोपीने मंदिरात बसून आधी हनुमान चालीसाचे पठण केले. यानंतर 10 रुपये दान म्हणून दानेपेटीत टाकले. त्यानंतर मंदिरात कोणीच नसल्याचे पाहून चोरट्याने दानपेटी फोडली आणि त्यातले पैसे चोरले. या धार्मिक चोरीनंतर आरोपीने तिथून पळ काढला. मात्र, हा सगळा प्रकार मंदिरातल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. पोलिसांनी मंदिराच्या पुजाराच्या तक्रारीनंतर चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.
विकास नगर येथील पंचमुखी मंदिराचे पुजारी रामनिवास हे हाथरसमधील विरा गावचे रहिवासी आहेत. त्यांनीच पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दिली होती. रामनिवास यांनी सांगितले की, "8 जुलै रोजी रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास ते मंदिराच्या आवारात काम करून त्यांच्या घराकडे जात होते. रात्री 9.30 वाजता त्यांनी मंदिराचे दरवाजे बंद केले होते. दुसऱ्या दिवशी मंदिराचे दरवाजे उघडून साफसफाई सुरु केली असता दानपेटी तुटलेली दिसली. त्यानंतर ही बाब मंदिर समितीच्या सदस्यांना कळवण्यात आली."
त्यानंतर मंदिर समितीच्या सदस्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास एक तरुण मंदिरात पूजा करत येत असल्याचे दिसून आले. सुरुवातीला तो दानपेटीजवळ बसून पूजा करताना दिसत होता. तो हनुमान चालिसाचे पठण करत असताना त्याच्या जवळ दुसरा भक्तही पूजा करत होता. दुसरी व्यक्ती तिथून निघून गेल्यावर आरोपीने पाकिटामधून 10 काढून दानपेटीत टाकले. यानंतर त्याने तीक्ष्ण हत्याराने झटका देऊन दानपेटी फोडली. मग त्यातले पैसे काढून शर्टमध्ये ठेवले आणि तिथून पळ काढला. त्याचवेळी पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.