रेल्वे क्रॉसिंगवर गाडी थांबताच माजी आमदारावर गोळ्यांचा वर्षाव; नफे सिंग राठींची हत्या
Nafe Singh Rathee : हरियाणामध्ये रविवारी आयएनएलडीचे प्रदेशाध्यक्ष नफे सिंग राठी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. बहादूरगडमध्ये काही हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. राठी यांच्यासह सुरक्षा कर्मचाऱ्यांपैकी एकाचा मृत्यू झाला आहे.
Nafe Singh Rathee Murder : हरियाणातील झज्जर जिल्ह्यात झालेल्या माजी आमदाराच्या हत्येने कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. हरियाणाच्या इंडियन नॅशनल लोकदलाचे प्रदेशाध्यक्ष नफे सिंग राठी अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली आहे. रविवारी झज्जर जिल्ह्यातील बहादूरगड येथे ही घटना घडली. नफे सिंग राठी हे एका पांढऱ्या कारमध्ये समोर बसले होते. त्यांची गाडी रेल्वे क्रॉसिंगवर थांबताच दुसऱ्या गाडीतून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडायला सुरुवात केली. जीव वाचवण्यासाठी लोक इकडे तिकडे धावू लागले. चार हल्लेखोरांनी राठी यांच्यावर गोळ्या झाडल्याचे म्हटलं जात आहे.
आयएनएलडीचे प्रदेशाध्यक्ष नफे सिंग राठी यांच्या हत्येने गायक सिद्धू मूसेवाला खून प्रकरणाची आठवण करुन दिली आहे. सिद्धू मूसेवालाची हत्याही याच पद्धतीने करण्यात आली होती. नफे सिंग राठी यांचीही त्यांच्या वाहनावर अंदाधुंद गोळीबार करून हत्या करण्यात आली. या शूटआऊटमध्ये राठी यांना जीव वाचवण्याची संधीही मिळाली नाही. ते तसेच गाडीत बसून राहिले. त्यानंतर नफे सिंग राठी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र त्याआधीच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. बहादुरगड येथे जात असताना राठी यांच्यावर हा हल्ला झाला.
i10 मधून आले होते संशयास्पद चार शूटर
दरम्यान, घटनास्थळाच्या आजूबाजूला लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात पोलिसांना संशयास्पद व्यक्ती दिसली. पोलीस वाहनाचा क्रमांक शोधण्याचा प्रयत्न करत आहे. पोलिसांना अद्याप कोणताही ठोस सुगावा लागलेला नाही.
नफे सिंग राठी यांची हत्या केल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून सहजरित्या पसार झाले. या घटनेत नफे सिंग राठी यांच्यासह त्यांच्या एका सुरक्षा कर्मचाऱ्यालाही जीव गमवावा लागला. राठींवर हल्ला झाला तेव्हा गाडीमध्ये 5 जण होते. ड्रायव्हरसोबत नफे सिंग पुढच्या सीटवर बसले होते. रविवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास त्यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला.
कोण होते नफे सिंग राठी?
नफे सिंग राठी हे दोन वेळा आमदार होते. 1996 ते 2005 या काळात ते बहादूरगडचे आमदार होते. नफे सिंग राठी हे हरियाणाच्या राजकारणातील लोकप्रिय चेहरा होते. ते माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांचे निकटवर्तीय मानले जात होते. पक्षावर त्यांची मजबूत पकड होती. राठी हे जाट नेते होते आणि बहादूरगडच्या जाटवाडा गावचे होते.