राहुल गांधींना पाकिस्तानशी युती करायचेय का?; अमित शहांचा टोला
पाकिस्तानकडून राहुल गांधींच्या आरोपांचे समर्थन
नवी दिल्ली: राफेल विमान खरेदी व्यवहारावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी पक्षाध्यक्ष अमित शहा पुढे सरसावले आहेत. शहा यांनी रविवारी ट्विट करून राहुल गांधींना लक्ष्य केले. राहुल गांधींनी पाकिस्तानशी आंतरराष्ट्रीय महायुती केली आहे का? कारण, राहुल गांधी आणि पाकिस्तान दोघांनाही मोदींना पंतप्रधानपदावरून दूर करायचे असल्याचे शहा यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
फ्रान्सचे माजी अध्यक्ष फ्रान्स्वा ओलांद यांनी राफेल व्यवहारातील रिलायन्स डिफेन्सच्या सहभागावरून महत्त्वपूर्ण खुलासा केला होता. त्यामुळे मोदी सरकार अडचणीत आले. यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन नरेंद्र मोदींनी भ्रष्टाचार केल्याचा घणाघाती प्रहार केला होता.
हाच धागा पकडत पाकिस्तानचे माहिती व सूचना प्रसारण मंत्री फावद हुसेन यांनी टिप्पणी केली होती. त्यांनी म्हटले होते की, पाकिस्तानशी चर्चा रद्द केल्याच्या मुद्द्यावरून लक्ष हटविण्यासाठी भ्रष्टाचाराचे हे प्रकरण बाहेर काढण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर अमित शहांनी राहुल यांनी लक्ष्य केले. राहुल गांधी 'मोदी हटवा' म्हणतात, आता पाकिस्तानही मोदी हटवा म्हणत आहे. पाकिस्तानने राहुल गांधींच्या आरोपांना पाठिंबाही दिला आहे. आता काँग्रेसला पाकिस्तानच्या साथीने आंतरराष्ट्रीय महायुती स्थापन करायची आहे का, असा टोला अमित शहा यांनी लगावला.