Success Story: चाळीत बालपण काढत उभारलं कोट्यवधींचं साम्राज्य; वयाच्या 66 व्या वर्षी HDFC बँकेची स्थापना करणारे `ते` कोण
HDFC Bank : सर्वसामान्य व्यक्तीच्या हक्काच्या घराचं स्वप्न साकारण्यासाठी त्यांनी एक विडा उचलला आणि1978 मध्ये एक किमया केली... आजही त्यांनी सुरु केलेल्या संस्थेचं नाव प्रत्येकाच्या तोंडी असतं.
Success Story : काही माणसं त्यांच्या कर्तृत्त्वानं इतकी मोठी होतात की त्यांच्याविषयी कितीही लिहिलं, बोललं गेलं तरी ते कमीच वाटतं. या व्यक्ती आपल्या जीनकाळात अशी काही कामं करून जातात, की वर्षानुवर्षे, अनेक पिढ्यांना त्यांच्या या कार्याचा फायदा होतो. अनेकांची आयुष्य मार्गी लागतात. असंच अनेकांचे आशीर्वाद मिळवणारं एक नाव म्हणजे हसमुखलाल ठाकोरदास पारेख.
आजच्या घडीला 9 लाखांहून अधिक मार्केट कॅप (Market Cap) असणारी HDFC बँक ही देशातील सर्वात मोठी आणि सर्वाधिक आर्थिक उलाढाल करणारी बँक ठरली असून या बँकेचा पाया रचणारी व्यक्ती म्हणजे एच.टी. पारेख. अर्थात हसमुखलाल ठाकोरदास पारेख. या व्यक्तीनं कोट्यवधींच्या संपत्तीचा डोलारा उभा केला खरा. पण त्यांच्या आयुष्याची सुरुवात ही मुंबईतील एका चाळीतून झाली होती. हलाखीच्या परिस्थितीशी दोन हात करत, शिक्षण घेत त्यांनी टप्प्याटप्प्यानं यश संपादन केलं.
वडिलांकडून मिळालं बँकेच्या व्यवहारांचं ज्ञान
पारेख यांना त्यांच्या वडिलांकडून बँकेच्या व्यवहारांची कल्पना, ज्ञान आणि शिकवणी मिळाली. मुंबईत पदवी शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी परदेशात जाण्याचा निर्णय घेतला आणि London येथे त्यांनी उच्च शिक्षण पूर्ण केलं. भारतात परतल्यानंतर त्यांनी आपल्या वेगळ्या कारकिर्दीची सुरुवात केली आणि HDFC बँकेचा पायाही रचला.
Part Time Job आणि बरंच काही...
मुंबईत शिक्षण घेत असल्यापासूनच पारेख यांनी नोकरी करण्यास सुरुवात केली होती. याच मेहनतीच्या बळावर शहरात अर्थशास्त्राचं शिक्षण घेत असताना त्यांना पुढे परदेशात जाऊन शिक्षण घेण्याची संधी मिळाली. जिथं त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्समधून बँकिंग अँड फायनान्समध्ये बीएससीची पदवी घेतली. मुंबईत परतल्यानतंर त्यांनी येथील सेंट झेवियर्स या नावाजलेल्या महाविद्यालयात प्राचार्यांची नोकरीही केली. पुढे त्यांनी हरकिसनदास लखमीदास स्टॉक ब्रोकिंग फर्मच्या जोडीनं आर्थिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली. ICICI मध्ये 16वर्षांच्या कार्यकाळानंतर ते निवृत्त झाले. जिथं त्यांनी उप महाप्रबंधक, अध्यक्ष अशी महत्त्वाची पदं भूषवली.
हेसुद्धा वाचा : SUV कार खरेदीच्या विचारात असाल, तर GST बिघडवणार तुमचं गणित; केंद्राचा मोठा निर्णय
निवृत्तीनंतर सुरु केली नवी इनिंग
सहसा साठीचं वय ओलांडलं की, अनेकजण आराम करण्याला प्राधान्य देतात. सेवानिवृत्त होतात. पण, पारेख मात्र याला अपवाद ठरले. ज्या वयात Second Home ची कल्पना आकारात आणण्यासाठी अनेकजण प्रयत्न करतात त्या वयात पारेख यांनी सर्वसामान्यांच्या घराचं स्वप्न साकार करण्यासाठी एक कल्पना अंमलात आणण्याचा निर्णय घेतला आणि पुन्हा एकदा या बँकिंग क्षेत्रात पदार्पण केलं. 1977 मध्ये त्यांनी एका आर्थिक संस्थेच्या रुपात एचडीएफसीची सुरुवात केली आणि 1978 मध्ये पहिल्यांदाच गृहकर्ज दिलं.
एचडीएफसीची वाटचाल सुरुच होती. दहा वर्षांहून कमी काळात म्हणजेच साधारण 1984 पर्यंत HDFC वर्षाला 100 कोटींहून अधिक कर्जाचा मान्यता देणारी संस्था ठरली होती. या अतुलनीय कामगिरीसाठी पारेख यांना भारत सरकारकडून 1992 मध्ये पद्म भूषण पुरस्कार प्रदान करण्यातआला. 1993 मध्ये एचडीएफसीला मुख्य प्रवाहात येण्याची मान्यता मिळाली आणि पुढे 30 वर्षांनंतर HDFC, HDFC बँक यांच्या विलिनीकरणातून 4.14 लाखांची उलाढाल असणाऱ्या एका भक्कम संस्थेनं जन्म घेतला.