चंदीगढ: भाजपने पंजाबच्या गुरुदासपूर मतदारसंघातून अभिनेता सनी देओल याला उमेदवारी दिल्यानंतर येथील राजकारणाला रंगत चढली आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी सनी देओलला लक्ष्य केले. त्यांनी म्हटले की, सनी देओल हा फिल्मी फौजी आहे, तर मी खरा फौजी आहे. आम्ही त्याचा सहज पराभव करू. गुरुदासपूरमधील काँग्रेसचे उमेदवारी सुनील जाखर यांना सनी देओलपासून कोणताही धोका नाही, असे अमरिंदर सिंग यांनी सांगितले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सनी देओलचे पिता धर्मेंद्र यांनी २००४ साली भाजपच्या तिकीटावर लोकसभा निवडणूक लढली होती. राजस्थानच्या बिकानेरमधून त्यांनी मोठा विजय संपादन केला होता. याशिवाय, अभिनेत्री हेमा मालिनी यादेखील भाजच्या खासदार आहेत. हेमामालिनी यंदा मथुरेतून रिंगणात उतरल्या आहेत. सनी देओल निवडणूक लढवत असलेल्या गुरुदासपूरचे प्रतिनिधित्व यापूर्वी दिवंगत अभिनेते विनोद खन्ना यांनीही केले होते. विनोद खन्ना यांच्या निधनानंतर ही जागा रिकामीच होती. यापूर्वी या जागेवर विनोद खन्ना यांची पत्नी कविता यांच्या नावाचीही चर्चा होती. मात्र, भाजपने अनपेक्षितपणे सनी देओलच्या नावावर शिक्कामोर्तब केले.


सनी देओल भाजपमध्ये जाताच 'ढाई किलो का हाथ'च्या मीम्सना उधाण


भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर सनी देओलने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतूक केले होते. माझे वडील माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्यासोबत होते. आज मी नरेंद्र मोदींसोबत आहे. पुढील पाच वर्षे तेच पंतप्रधानपदी राहावेत, अशी माझी इच्छा आहे. युवकांना मोदींची गरज आहे. मी या कुटुंबात सहभागी झालो आहे. जे-जे शक्य आहे ते नक्कीच करून दाखवणार आहे. मी फक्त बोलणार नाही, तर ते मी माझ्या कामातून दाखवून देईन, असे सनी देओलने सांगितले होते.