Health News : तुम्ही घेताय ती डायबिटीज, ब्लड प्रेशरची औषधं बनावट तर नाहीत? फेक मेडिसिन गँगमुळं पितळ उघड
Health News : बदलत्या जीवनशैलीनुसार अनेकदा काही शारीरिक व्याधी आपल्याला विळखा घालतात आणि मग आयुष्यभरासाठी काही औषधं आपली पाठ सोडत नाहीत.
Health News : भारतामध्ये मागील काही वर्षांचा आलेख पाहिल्यास नागरिकांच्या जीवनशैलीत झालेल्या बदलांकडे लक्ष वेधलं जातं. सातत्यानं सुरु असणारी स्पर्धा आणि या स्पर्धेमुळं आरोग्याकडे होणारं दुर्लक्ष या साऱ्या परिस्थितीतून पुढं खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल, व्यायामाचा अभाव या गोष्टी अंगवळणी पडतात. परिणामी देशातील एक मोठी पिढी मधुमेह अर्थात डायबिटीज आणि रक्तदाब म्हणजेच ब्लड प्रेशरसारख्या शारीरिक व्याधींचा सामना करताना दिसते.
भारतामध्ये या व्याधींनी ग्रासलेल्यांचा आकडा तुलनेनं अधिक असून यामध्ये फक्त उतार वयातील मंडळींचाच नव्हे, तर मध्यमवयीन नागरिकांचाही समावेश आहे. यावर उपचार म्हणून ही मंडळी दर दिवशी काही औषधांचा आधार घेतात. पण, डॉक्टरांच्या सल्ल्यानं तुम्ही घेत असलेली औषधं बनावट नाहीत ना? दिल्लीतून समोर आलेल्या एका खळबळजनक घटनेमुळं सध्या हा प्रश्न उपस्थित होत आहे.
बनावट औषधांची सर्रास विक्री
दिल्लीनजीक असणाऱ्या गाजियाबादमधीस एका फॅक्ट्रीतून हे धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. जिथं LED Bulb च्या कारखान्यामध्ये ब्लड प्रेशर, डायबिटीज आणि Antacid ची बनावट औषधं तयार करून त्यांची विक्री सुरु असल्याची बाब निदर्शनास आली. दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून करण्यात आलेल्या या कारवाईमध्ये 1 कोटी 10 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलीस तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार इथं काही मोठ्या औषध कंपन्यांच्या नावाचा वापर करत बनावट औषधं तयार केली जात होती. भारतात विक्री केल्या जाणाऱ्या अनेक औषधांचा यामध्ये समावेश होता. मुख्य म्हणजे आतापर्यंत अनेक घरांमध्ये ही औषधं पोहोचलीसुद्धा असतील अशी भीतीही पोलीस यंत्रणांनी व्यक्त केली आहे.
पोलिसांच्या या धाडीमध्ये त्यांना या कारखान्यामध्ये औषधं तयार करण्याचं साहित्य आणि कच्चा माल सापडला. तपास अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार इथं तयार करण्यात आलेल्या या औषधांमुळं अनेकांच्या आरोग्यास धोकाही निर्माण होऊ शकतो.
हेसुद्धा वाचा : तुमच्या सर्चवर Google ची बारीक नजर! इंटरनेट सर्फिंग होणार अधिक सुरक्षित; युझर्सला फायदाच फायदा
दरम्यान, दिल्ली स्थानिक पोलीस यंत्रणा आणि गुन्हे शाखेनं एकत्र येत करण्यात आलेल्या या कारवाईमध्ये विजय चौहान नावाचा इसम हा कारखाना चालवत होता अशी माहिती मिळताच त्याला तातडीनं ताब्यात घेण्यात आलं. या कारखान्याच्या तळ मजल्यावर एलईडी बल्बचा कारखाना ठेवत वरच्या मजल्यावर या बनावट औषधांचं काम सुरु होतं. सध्या या कारखान्यातून 14 नमुने चाचणीसाठी पाठवण्यात आले असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.