नवी दिल्ली : अजित पवारांच्या साथीने भाजपने शपथविधी केल्यावर आता काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना या तीन पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. आज सकाळी साडेअकरा वाजता यावर सुनावणी करण्यात येणार आहे. नव्याने निर्माण झालेल्या भाजप सरकारला आजच विश्वासदर्शक ठराव सादर करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी या तीनही पक्षांच्या याचिकेत करण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राष्ट्रवादीचे सर्व आमदारांना मुंबईच्या रेनेसान्स या हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची आज २ वाजता विधीमंडळ पक्षाची बैठक पार पडणार आहे. यामुळे आज राष्ट्रवादीच्या गोटात काय घडणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.


शरद पवार आणि आम्ही एकत्र येऊन सरकार बनवू, असा विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला आहे. आमच्या आमदारांना फोडण्याचा प्रयत्न करुन दाखवा, असं आव्हान उद्धव ठाकरेंनी दिलं आहे. हिंमत हरु नका, आपण सगळे एकत्र राहुया. असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी आमदारांना केलं आहे. आमदारांची भेट घेण्यासाठी उद्धव ठाकरे पोहोचताच आमदारांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. 


अनेक आमदारांनी संजय राऊतांवरही नाराजी व्यक्त केली. त्यावर माझं शरद पवारांशी बोलणं झालंय. आपलं सरकार येईल आणि शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल, असं सांगत उद्धव ठाकरे यांनी आमदारांना शांत करण्याचा प्रयत्न केला. शिवसेनेचे आमदार सध्या ललितमध्येच राहणार आहेत.


अजित पवार यांनी शरद पवार यांना अंधारात ठेऊन भाजपला पाठिंबा देत, उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. संतप्त राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या निषेधात जोरदार घोषणाबाजी केली.