Rain Updates: देशातील 17 राज्यात पुढील 3 दिवस मुसळधार पाऊस, महाराष्ट्राची काय स्थिती?
17 राज्यांमध्ये पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस पडू शकतो.
मुंबई : ऑक्टोबरमध्ये मान्सून निघून गेल्यानंतरही अनेक राज्यांमध्ये पाऊस सुरूच आहे. दिल्ली, महाराष्ट्र, यूपीसह अनेक राज्यांमध्ये शनिवारी पाऊस झाला. सुमारे 12 तास झालेल्या पावसामुळे दिल्लीतील अनेक भाग ठप्प झाले होते. दिल्ली पोलिसांनी प्रवाशांना हे लक्षात घेऊनच प्रवास योजना बनवण्याचा सल्ला दिला आहे. त्याचवेळी, हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, दिल्लीसह 17 राज्यांमध्ये पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस पडू शकतो.
IMD नुसार येत्या 2-3 दिवसांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हरियाणामध्ये 8 आणि 9 ऑक्टोबर रोजी हलका ते मध्यम पाऊस सुरू राहील, तर उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि पूर्व राजस्थानमध्ये 11 ऑक्टोबरपर्यंत पाऊस सुरू राहील.
मिळालेल्या माहितीनुसार, वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे पावसाळा संपल्यानंतरही पाऊस पडत आहे. चक्रीवादळाचे परिवलन किनारी आंध्र प्रदेश आणि लगतच्या भागात आहे. चक्रीवादळ परिवलन पासून वायव्य उत्तर प्रदेश तेलंगणा, विदर्भ, पश्चिम मध्य प्रदेश आणि पश्चिम उत्तर प्रदेशात पसरतंय.
दक्षिण बंगालच्या उपसागराच्या मध्यभागी चक्रीवादळाचे परिवलन कायम आहे. हवामान खात्याने मुंबई आणि लगतच्या ठाणे, पालघर आणि कोकण विभागातील जिल्ह्यांसाठी पुढील दोन दिवस यलो अलर्ट जारी केला आहे.
या राज्यांमध्येही पावसाचा अंदाज
8 आणि 9 ऑक्टोबरला पश्चिम बंगाल आणि सिक्कीम, 9 आणि 10 ऑक्टोबरला ओडिशा, बिहारमध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो.
8 ते 11 ऑक्टोबर दरम्यान आंध्र प्रदेश, तामिळनाडू, पुद्दुचेरी, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालयमध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो.
9 आणि 10 ऑक्टोबर रोजी उत्तर कर्नाटकात पावसाची शक्यता आहे.
दक्षिण आतील कर्नाटकात 9 ते 11 ऑक्टोबर दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता आहे.
नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा येथे 10 ते 11 ऑक्टोबर दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता आहे.