भोपाळ : मध्य प्रदेशात पावसाचा कहर पहायला मिळतो आहे. मंदसौर जिल्ह्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे अनेक भागात पूरस्थिती आहे. ग्रामीण भागाशी संपर्क तुटला आहे. हरदामध्ये देखील संततधार पाऊस सुरु आहे. अजनाल नदीच्या पाणीपातळीत वेगानं वाढ होत असल्यामुळे सखल भागातील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं आहे. तर नर्मदा नदीनं धोका पातळी ओलांडली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खंडवा ओंकारेश्वर धरणाचे १८ दरवाजे उघडल्यामुळे पाण्याची पातळी आणखी वाढली आहे. त्यामुळेच नर्मदेच्या काठावरील बडवाह, महेश्वर, कसरावद आणि मंडलेश्वरमधल्या सखल भागातल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवलं आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनानं नर्मदा पुलावरून अवजड वाहनांची वाहतूक बंद केली आहे. जोरदार पावसामुळे भोपाळ, रायसेन, विदिशा, मंडला, सागर, हरदा, बालाघाट, जबलपूर, सिवनी, उज्जैन, नरसिंहपूरमध्ये शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.


मध्य प्रदेशात पुढील २४ तासांत मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार मध्य प्रदेशात यंदा दुप्पट पाऊस पडला आहे.