कोरोना साथीत मोठे संकट; या राज्याला बसणार चक्रीवादळाचा तडाखा, सहा राज्यांत जोरदार पाऊस
Cyclone in Gujarat: देशात काही राज्यांमध्ये नवीन संकट उभे राहण्याची शक्यता आहे.
मुंबई : Cyclone in Gujarat: देशात काही राज्यांमध्ये नवीन संकट उभे राहण्याची शक्यता आहे. भारतीय हवामाना विभागाने दिलेल्या इशाऱ्यानंतर गुजरात राज्यात जोरदार वादळासह पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. गुजरातच्या समुद्र किनाऱ्यावर चक्रीवादळ धडकण्याची जास्त शक्यता आहे. या चक्रीवादळामुळे मोठे नुकसान होऊ शकते, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. आधीच कोरोना विषाणूचे संकट (Coronavirus Pandemic) आणि आता हे चक्रीवादळाचे संकट गुजरातवर घोंगावत आहे. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार 17 आणि 18 मे रोजी जोरदार चक्रीवादळ समुद्र किनारी धडकणार आहे.
आधीच कोरोनाव्हायरस महामारीचा सामना गुजरातला करावा लागत आहे. त्यातच आता गुजरातमध्ये चक्रीवादळाचा धोका आहे, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. हवामान खात्याने 17 आणि 18 मे रोजी पश्चिम किनाऱ्यावरुन चक्री वादळ वाहण्याचा अंदाज वर्तविला आहे. तथापि, हे चक्रीवादळ पाकिस्तानच्या कराची किनाऱ्यावर आदळण्याची शक्यता आहे. असे असले तरी गुजरातच्या समुद्र किनाऱ्यालाही याची जोरदार धडक बसू शकते.
चक्रीवादळाला Tauktae असे नाव देण्यात आलेय
2021मधील हे पहिले चक्रीवादळ असेल आणि त्याला 'Tauktae' असे नाव देण्यात आले. यावेळी वादळाचे नाव म्यानमारमधून देण्यात आले आहे, म्हणजे, जोरात आवाज देणारी पाल. हिंदी महासागर प्रदेशातील आठ देशांनी भारताच्या पुढाकाराने चक्रीय वादळांना नावे ठेवण्यासाठी औपचारिक व्यवस्था सुरु केली होती. या देशांमध्ये भारताव्यतिरिक्त बांग्लादेश, पाकिस्तान, म्यानमार, मालदीव, श्रीलंका, ओमान आणि थायलंडचा समावेश आहे.
मुख्यमंत्र्यांकडून सूचना जारी
गुजरात किनाऱ्यावर चक्रीवादळ धडकण्याची शक्यता असल्याने गुजरात राज्याचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी बैठक घेऊन किनारी जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे व आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. पूर्व-मध्य अरबी समुद्रात चक्रीवादळामुळे सौराष्ट्र आणि दक्षिणेकडील भागासह गुजरातच्या किनारपट्टी भागात जोरदार वादळ येण्याची शक्यता हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे.
या राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा
गुजरातशिवाय गोवा, कर्नाटक, महाराष्ट्र, केरळ आणि लक्षद्वीप यांना किनारपट्टी भागात जोरादर पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. यासह हवामान खात्याने मच्छीमारांना समुद्रात जाऊ नये, असा इशारा दिला आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार लक्षद्वीप आणि मालदीवच्या भागात ताशी 40 ते 60 किलोमीटर वेगाने जोरदार वारे वाहतील. याशिवाय केरळ, गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्रातील किनारपट्टी भागातील लोकांना वादळी वाऱ्यासह पावसाचा सामना करावा लागणार आहे.