श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर शुक्रवारी पाकिस्तानकडून जोरदार गोळीबारात करण्यात आला. या गोळीबारात एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. पाकिस्तानकडून मोठ्या बंदुकीतून या भागातील सामान्य नागरिकांना लक्ष्य करण्यात आले. भारतीय सैन्याकडूनही या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देण्यात आले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुंछ जिल्ह्यातील सलोत्रीमध्ये मोठा गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात रूबाना कौसर(24), त्यांचा मुलगा फजान(५) आणि नऊ महिन्यांची मुलगी शबनम हिचा मृत्यू झाला असून रूबानाचे पती मोहम्मद यूनिस, जखमी झाले आहेत. या भागातील अनेक घरांना या गोळीबाराचा फटका बसला. पुंछ जिल्ह्यातील मनकोट भागात पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात नसीम अख्तर ही महिला देखील गंभीर जखमी झाली आहे. सलोत्री आणि मनकोट व्यतिरिक्त पुंछ जिल्ह्यातील कृष्णाघाटी आणि बालाकोट भागातही गोळीबार करण्यात आला. शुक्रवारी करण्यात आलेला गोळीबार हा पाकिस्तानकडून सतत आठव्या दिवशी करण्यात आलेला गोळीबार आहे.



पाकिस्तानकडून गेल्या एका आठवड्यापासून ६०हून अधिक वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. राजौरी आणि पुंछ जिल्ह्यातील नियंत्रण रेषेपासून पाच किलोमीटरपर्यंत असणाऱ्या शैक्षणिक संस्था काही काळासाठी बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच सीमेवर राहणाऱ्या नागरिकांनाही बाहेर न पडता आपल्या घरांतच राहण्याचे सांगण्यात आले आहे.