`करकरेंविषयीचे ते वक्तव्य मागे घेऊन साध्वी प्रज्ञांनी माणुसकी दाखवली`
साध्वी यांच्या या विधानाने देशभरात मोठी खळबळ माजली होती.
भोपाळ: हेमंत करकरे यांनी साध्वी प्रज्ञा यांचा छळ केला होता. यासंदर्भात त्यांनी वाच्यता केल्यानंतर मोठा गदारोळ झाला. तेव्हा केवळ माणुसकीच्या दृष्टीकोनातून साध्वी प्रज्ञा यांनी आपल्या वक्तव्यापासून माघार घेतली, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते इंद्रेश कुमार यांनी सांगितले. ते बुधवारी भोपाळ येथील पत्रकार परिषदेत बोलत होते.
लोकसभा निवडणुकीच्या काळात साध्वी प्रज्ञा यांनी मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास करणारे माजी एटीएस प्रमुख दिवंगत हेमंत करकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केले होते. करकरे यांनी मला विनाकारण मालेगाव बॉम्बस्फोटात गोवले. त्यांनी मला प्रचंड यातना दिल्या. त्यांचा मृत्यू त्यांच्या कर्मामुळेच झाला. मी त्यांना तुमचा सर्वनाश होईल, अशा शाप दिला होता. तो अखेर खरा ठरला, असे वक्तव्य साध्वी यांनी म्हटले होते.
साध्वी यांच्या या विधानाने देशभरात मोठी खळबळ माजली होती. अनेकांनी साध्वी प्रज्ञा आणि भाजपवर सडकून टीकाही केली होती. लोकसभा निवडणूक तोंडावर असल्यामुळे साध्वी यांनी आपले वक्तव्य मागे घेतले होते.
मात्र, साध्वी प्रज्ञा यांनी हा निर्णय केवळ माणुसकीच्या भावनेने घेतला होता. दहशतवाद्यांशी लढताना हेमंत करकरे शहीद झाले. त्यांचा आदर नक्कीच केला पाहिजे. मात्र, तत्कालीन काँग्रेस सरकारने तपास यंत्रणांचा गैरवापर करून भगव्या दहशतवादाचे भूत उभे केले. यानंतर साध्वी प्रज्ञा यांचा छळ करण्यात आला. हेमंत करकरे यांचे हे कृत्य चुकीचे होते. याविषयी साध्वी प्रज्ञा यांनी वाच्यता केल्यानंतर देशभरात गदारोळ उडाला होता. तेव्हा केवळ माणुसकी म्हणून साध्वींनी आपले वक्तव्य माघारी घेतले, असे इंद्रेश कुमार यांनी सांगितले.