चेहऱ्यावर वार, कवटीला फ्रॅक्चर; रक्ताच्या थारोळ्यात आढळली महिला कॉन्स्टेबल, न्यायाधीशांना WhatsApp मेसेज अन्...
सरयू एक्स्प्रेसमध्ये एका महिला कॉन्स्टेबलवर हल्ला झाल्यानंतर आणि ती रक्ताच्या थारोळ्यात आढळल्यानंतर अलाहाबाद हायकोर्टाने स्वत: या घटनेची दखल घेतली आहे. हायकोर्टाने आपलं कर्तव्य पार पाडण्यात अपयशी ठरल्याबद्दल रेल्वे संरक्षण दलाला फटकारलं आहे.
सरयू एक्स्प्रेसमध्ये एका महिला कॉन्स्टेबलवर हल्ला झाल्यानंतर आणि ती रक्ताच्या थारोळ्यात आढळल्यानंतर अलाहाबाद हायकोर्टाने स्वत: या घटनेची दखल घेतली आहे. महिला कॉन्स्टेबल जखमी अवस्थेत आढळली होती. विशेष म्हणजे, या घटनेच्या व्हॉट्सअप मेसेजची दखल घेत दोन न्यायाधीशाचं खंडपीठ तयार करण्यात आलं आहे. हायकोर्टाने स्वत: या घटनेची दखल घेतली असून, कर्तव्य पार पाडण्यात अपयशी ठरल्याबद्दल रेल्वे संरक्षण दलाला फटकारलं आहे.
मुख्य न्यायमूर्ती प्रितिंकर दिवाकर आणि न्यायमूर्ती आशुतोष श्रीवास्तव यांनी आपलं कर्तव्य नीट न पाडल्याने आरपीएला खडे बोल सुनावले आहेत. यावेळी त्यांनी सरकार रेल्वो पोलिसांना 13 सप्टेंबरपर्यंत या घटनेप्रकरणी प्रगती अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
प्रकरणं इतकं गंभीर आहे की, मुख्य न्यायमूर्ती प्रितिंकर दिवाकर यांनी रविवारी रात्री आपल्या घऱी विशेष कोर्ट भरवलं आणि याचिका दखल करत रात्री सुनावणी घेतली. यावेळी त्यांनी फक्त नाराजी जाहीर केली नाही, तर राज्य सरकार आणि रेल्वेला नोटीस जारी केली. रविवारी सुट्टी असतानाही रात्री 9.30 वाजता विशेष कोर्टाने सुनावणी घेत इतिहास रचला आहे.
"या घटनेवरून भारतीय रेल्वे कायद्यातील काही तरतुदींचे सर्रास उल्लंघन झाल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे. शिवाय, प्रवाशांच्या सुरक्षेसाठी तयार करण्यात आलेल्या नियम आणि नियमांची अंमलबजावणी करण्यात रेल्वे संरक्षण दलही त्यांचं कर्तव्यं आणि जबाबदाऱ्या पार पाडण्यात पूर्णपणे अपयशी ठरलं आहे. सध्याची घटना केवळ महिलांविरुद्धचा गुन्हा नाही तर संपूर्ण समाजाविरुद्ध आहे. या घटनेमुळे महिलांचं मानसशास्त्र उद्ध्वस्त झालं आहे,’ असं हायकोर्टाने म्हटलं आहे.
सरयू एक्स्प्रेसमध्ये एका महिला पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला करण्यात आला होता. रविवारी मुख्य मुख्य न्यायमूर्ती दिवाकेर आपल्या घरी बसलेले असताना त्यांच्या व्हॉट्सअपवर या घटनेसंबंधी मेसेज आला. यानंतर त्यांनी त्या मेसेजच्या आधारे कारवाई केली. त्यांनी एक खंडपीठ स्थापन करण्याचा आदेश दिला. ज्यामध्ये ते स्वत: आणि न्यायमूर्ती श्रीवास्तव सहभागी झाले. या खंडपीठाने आरपीएफ आणि रेल्वे संरक्षण दलाला नोटीस पाठवली.
या महिला पोलीस कर्मचाऱ्याची ओळख जाहीर करण्यात आलेली नाही. 30 ऑगस्टला अयोध्या स्थानकावर सरयू एक्स्प्रेसमध्ये महिला बेशुद्ध अवस्थेत आढळली होती. तिच्या चेहऱ्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला होता. तसंच तिच्या कवटीला दोन फ्रॅक्चर होते.
महिला कॉन्स्टेबलला लखनऊच्या केजीएमसी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सध्या तिची प्रकृती स्थिर आहे अशी माहिती रेल्वे संरक्षण दलाने दिली आहे.
महिला कॉन्स्टेबलच्या भावाने पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर, याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला होता. कलम 332 (सरकारी कर्मचाऱ्याला कर्तव्यापासून परावृत्त करण्यासाठी स्वेच्छेने हानी पोहोचवणे), 353 (सरकारी कर्मचाऱ्याला त्यांचे कर्तव्य बजावण्यापासून परावृत्त करण्यासाठी प्राणघातक हल्ला किंवा गुन्हेगारी शक्ती) आणि 307 (हत्येचा प्रयत्न) अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे.
पोलिसांनी अद्याप तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे कोणतेच पुरावे हाती नसल्याचं सांगितलं आहे. तसंच याप्रकरणी अद्याप तपास सुरु आहे.