मुंबई : ऑगस्ट महिन्यात देशात गेल्या ४४ वर्षातील सर्वाधिक पाऊस झाला आहे. यामुळे नद्यांसह अनेक राज्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. भारतीय हवामान खात्याच्या (आयएमडी) आकडेवारीनुसार यंदाच्या ऑगस्टमध्ये २८ तारखेपर्यंत २५ टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे. यापूर्वी १९७६ मध्ये ऑगस्टमध्ये २३.८ टक्के जास्त पाऊस झाला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय हवामान खात्याच्या (आयएमडी) आकडेवारीनुसार, देशात सामान्यपेक्षा ९ टक्के जास्त पाऊस झाला आहे. बिहार, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, गुजरात आणि गोव्यात जास्त पावसाची नोंद झाली आहे. सिक्कीममध्येही जास्त पावसाची नोंद झाली आहे.


केंद्रीय जल आयोगाच्या (सीडब्ल्यूसी) मते, २७ ऑगस्टपर्यंत देशातील एकूण जलाशयातील साठा मागील वर्षीच्या तुलनेत चांगला आहे. यंदा गेल्या दहा वर्षात याच कालावधीतील सरासरी साठा क्षमतेपेक्षा अधिक आहे. सीडब्ल्यूसीने म्हटले आहे की, दक्षिण भारतातील गंगा, नर्मदा, तापी, माही, साबरमती, कच्छ, गोदावरी, कृष्णा, महानदी आणि कावेरी आणि पश्चिमेकडे वाहणाऱ्या नद्यांच्या नदी पात्रात सामान्यपेक्षा जास्त पाण्याची पातळी आहे. मात्र, अतिवृष्टीमुळे देशातील बर्‍याच भागात पूरसदृश परिस्थिती आहे.


जम्मू-काश्मीर, मणिपूर, मिझोरम आणि नागालँड या केंद्रशासित प्रदेशात यंदा कमी पाऊस झाला आहे. देशातील मान्सूनचा पहिला हंगाम १ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत असतो. जूनमध्ये देशात १७ टक्के जास्त पाऊस झाला, तर जुलै महिन्यात हा सामान्यपेक्षा १० टक्के कमी पाऊस पडला.


आयएमडीच्या मते, सप्टेंबरमध्ये तुलनेने कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. परंतु देशभरात पावसाचे एकसमान वितरण झाल्यामुळे खरीप हंगामातील पिकांचे उत्पादन वाढेल. ऑक्टोबरचा अंदाज अद्याप जाहीर झालेला नाही.


१ ते २८ ऑगस्ट दरम्यान पाऊस


आयएमडीच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास, १ ऑगस्ट ते २८ ऑगस्ट या कालावधीत देशात २९६.२ मिलिमीटर पाऊस पडला आहे, तर गेल्या अनेक वर्षातील आकडेवारीनुसार याच महिन्यात सरासरी २३७.२ मिलिमीटर पाऊस पडतो. ऑगस्टमध्ये देशात सरासरीपेक्षा 25 टक्के जास्त पाऊस झाला आहे. यापूर्वी १९७६ मध्ये ऑगस्ट महिन्यात सरासरी २३.८ टक्के जास्त पाऊस झाला होता.


१९२६ मध्ये सर्वाधिक पाऊस


१९२६ मध्ये ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक 33 टक्के पाऊस होता. यावर्षी देशात नऊ टक्के अधिक पाऊस झाला. भारताच्या दक्षिण भागात 23 टक्के जास्त पाऊस झाला. मध्य भारतात यावर्षी हा आकडा 16 टक्के होता, तर वायव्य भारतात यावर्षी 12 टक्के कमी पाऊस झाला आहे. ईशान्य भारतातील काही राज्यात चार टक्के जास्त पाऊस झाला आहे.