नवी दिल्ली: गेल्या २४ तासांत देशात कोरोनाचे तब्बल २० हजार नवे रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोना व्हायरसचा Coroanvirus प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. आठवडाभरापासून दररोज देशात १५ हजारांपेक्षा जास्त नवीन रुग्ण आढळत आहेत. मात्र, आता हा आकडा २० हजारापर्यंत जाऊन पोहोचला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गोव्यात कोरोनाच्या सामूहिक संसर्गाला सुरुवात; मुख्यमंत्र्यांची धक्कादायक कबुली


केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाचे १९,९०६ रुग्ण आढळून आले. तर ४१० जणांचा मृत्यू झाला. कोरोना रुग्णांच्या संख्येतील ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ५,२८,८५९ इतका झाला आहे. यापैकी २,०३,०५१ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर ३,०९,७१३ जण कोरोनातून बरे झाले आहेत. मात्र, कोरोनामुळे देशात १६,०९५ लोकांचा बळी गेला आहे. देशातील आरोग्य यंत्रणांच्यादृष्टीने ही चिंतेची बाब आहे. महाराष्ट्र, तेलंगणा, गुजरात आणि दिल्लीत सध्या कोरोना प्रादुर्भावाची परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. केंद्रीय पथकाने नुकताच महाराष्ट्राचा दौराही केला होता. यावेळी केंद्रीय आरोग्य सचिव लव अग्रवाल यांनी, रुग्णांची संख्या वाढली तरी घाबरून जाऊ नका, पण मृत्यूदर नियंत्रणात ठेवा, असे डॉक्टरांना सांगितले होते. 



महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक कोरोना रुग्णसंख्या असलेले राज्य आहे. शनिवारी महाराष्ट्रात कोरोनाचे ५३१८ नवे रुग्ण आढळून आले होते. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या नव्या रुग्णांच्याबाबतीत महाराष्ट्र दररोज नवनवे उच्चांक गाठत आहे. राज्यात आज ६७,६०० ऍक्टिव्ह रूग्ण आहेत. मुंबईत १४०२ कोरोनाबाधित रूग्ण आढळले आहेत. आतापर्यंत हा आकडा ७४२५२ एकूण कोरोना रूग्ण आढळले आहेत. त्यापैकी ४१ कोरोनाबाधितांचा मृत्यू आज झाला आहे. असे एकूण ४२८४ रूग्णांचा मृत्यू झाला आहे.