नवी दिल्ली: वैमानिकाने विमान हायजॅक झाल्याचा इशारा दिल्याने शनिवारी दिल्ली विमानतळावर प्रचंड गोंधळ उडाला. कंदहारला जाणाऱ्या एफजी३१२ या विमानाच्या उड्डाणाला काही मिनिटे शिल्लक असताना हा प्रकार घडला. यावेळी विमानात प्रवेश केल्यानंतर वैमानिकाने चुकून हायजॅकचा इशारा देणारे बटन दाबले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे बटन दाबल्यानंतर विमानतळावरील राष्ट्रीय सुरक्षा दलासह (एनएसजी) सर्व सुरक्षा यंत्रणांना विमान हायजॅक झाल्याचा इशारा मिळाला. त्यामुळे विमातळावर सुरक्षेच्यादृष्टीने प्रचंड धावपळ सुरु झाल्याची माहिती 'पीटीआय'ने दिली.


विमानतळावरील सुरक्षा यंत्रणा आणि एनएसजीच्या कमांडोंनी तात्काळ धावपट्टीवर जाऊन विमानाला घेराव घातला. हे दृश्य पाहून विमानातील प्रवाशी घाबरले. यानंतर तब्बल दोन तास सुरक्षा यंत्रणांकडून विमान सुरक्षित असल्याची खातरजमा सुरु होती. 


अखेर सुरक्षेचे सर्व सोपस्कार पार पडल्यानंतर अरिआना अफगाण एअरलाईन्सचे हे विमान हवेत झेपावले. मात्र, दरम्यानच्या काळात सुरु असलेल्या घडामोडींमुळे दिल्ली विमानतळावर घबराटीचे वातावरण पसरले होते. 


दरम्यान, या प्रकाराविषयी अजूनपर्यंत विमानतळ प्राधिकरणाकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.