घरात लग्नाची तयारी सुरू असताना 27 वर्षीय जवानाला सीमेवर वीरमरण
अवघ्या काही महिन्यांवर लग्न आलं होतं. घरी लग्नाची लगबग सुरु होती, सीमेवरुन घरी फोन आला अन्.....
मुंबई: एप्रिलच्या सुट्टीसाठी आलेल्या जवानाच्या घरच्यांनी लग्न ठरवलं. मुहूर्तही ठरला लग्नाची तयारी सुरू झाली. सर्वजण आनंदात होते. मात्र अचानक आनंदाची जागा शोकाकूल वातावरणानं घेतली. 27 वर्षीय जवानाला वीरमरण आल्याची माहिती कुटुंबियांना कळली आणि त्यांनी टाहो फोडला. तणाताठा मुलगा देशसेवा करताना शहीद झाला.
जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यामध्ये मनकोट सेक्टरजवळ नियंत्रण रेषेजवळ झालेल्या ब्लास्टमध्ये 27 वर्षीय जवान शहीद झाला. भारतीय सैन्य दलाने याबाबत माहिती दिली आहे. शहीद कमल वैद्य डोगरा रेजिमेंटमध्ये तैनात होता. घुमारली गावाचा कमल वैद्य रहिवासी होता. त्याच्या पश्चात आई-वडील, मोठा भाऊ आणि दोन बहिणी असं कुटुंब आहे.
एप्रिल महिन्यात तो सुट्टीसाठी आपल्या गावी आला होता. त्यावेळी लग्नाची बोलणी सुरू होती. त्याचं लग्नही ठरलं. ऑक्टोबर महिन्यात लग्न करण्याचा मुहूर्त निघाला. सगळं ठरवून आनंदाने पुन्हा आपल्या कामावर जॉइन झाला.
कुटुंबातही लग्नाची धूमधाम तयारी सुरू होती. लग्न जवळ येत असल्याने कपडे, दागिने घेण्याची लगबग असताना अचानक ही बातमी कुटुबियांना कळली. कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. जवान कमल वैद्य सीमेवर झालेल्या माइन ब्लास्टमध्ये शहीद झाल्याची माहिती मिळाली आहे.