Himachal Pradesh Video : हिमाचल प्रदेशात काही दिवासांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळं मोठं नुकसान झालं. (Parvati, biyas river) पार्वती, बियास यांसारख्या नद्यांना पूर आल्यामुळं नद्याचं पाणी हिमाचलमधील अनेक गावांमध्ये शिरलं आणि अनेक घरं, हॉटेलं आणि इतर गोष्टी यामध्ये उध्वस्त झाल्या. या संकटातून हिमाचल सावरत नाही तोच पुन्हा एकदा एका नव्या संकटानं इथं हजेरी लावली. हे संकट होतं ढगफुटीचं ( Himachal Cloudburst). 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बुधवारी हिमाचलमधील सिरमुर जिल्ह्यात ढगफुटी झाली आणि त्यामुळं गिरी नदीच्या पाणी पातळीच अचानकच वाढ झाली. काही कळण्याच्या आतच नदीच्या पात्रानं रौद्र रुप धारण केलं आणि प्रचंड ताकदीनं पाणी प्रवाहित झालं. परिणामी निसर्गाच्या या रुपानं सर्वांनाच धडकी भरवली. नदीच्या पाणी पातळीत इतकी वाढ झाली की, हे पाणी जवळच्या सर्व वस्त्यांमध्ये शिरलं ज्यामुळं पुन्हा एकदा नागरिकांना मोठ्या नुकसानाला सामोरं जावं लागण्याची परिस्थिती निर्माण झाली. 


हेसुद्धा वाचा : Maharashtra Rain : क्षणात बदलतंय राज्यातील हवामान; आता कोणत्या भागात मुसळधार? 



दरम्यान, यंदाच्या वर्षी 24 जूनपासून आतापर्यंत हिमाचलमध्ये झालेला पाऊस, ढगफुटीसदृश घटना, भूस्खलन या दुर्घटनांमध्ये तब्बल 223 जणांनी जीव गमावला आहे. तर, 295 जण यामध्ये दुखापतग्रस्त असल्याचं सांगण्यात येत आहे. आतापर्यंत 800 घरं उध्वस्त झाली असून, तब्बल 7500 घरांचं काही प्रमाणात नुकसान झाल्याची आकडेवारी समोर येत आहे. फक्त घरं नव्हे, तर हिमाचलमध्ये स्थानिक वास्तू, शाळा आणि इतरही अनेक बांधकामांचं नुकसान झाल्याची माहिती राज्यातील मंत्री जगत सिंह नेगी यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली. 


स्पितीच्या खोऱ्यात भूकंपाचे हादरे... 


हिमाचलच्या मैदानी भागात पूर आलेला असतानाच पर्वतीय भागामध्ये असणाऱ्या स्पितीच्या खोऱ्यात मात्र भूकंपाचे हादरे जाणवले आहेत. रिश्टर स्केलमध्ये या भूकंपाची तीव्रता 3.4 इतकी मोजण्यात आली. अद्यापही इथं कोण्याही जिवीत किंवा वित्त हानीची माहिती समोर आलेली नाही. बुधवारी रात्री 11 वाजून 20 मिनिटांच्या सुमारास भूकंपाचे हादरे जाणवल्याचं सांगण्यात आलं. 



हिमाचलमध्ये गेल्या काही दिवसांपासून भूकंपाचे सौम्य धक्के जाणवत आहेत. गेल्या महिन्यामध्ये इथं कांगडा जिल्ह्यातही भूकंप आला होता ज्याची तीव्रता 3 रिश्टर स्केल इतकी होती. दरम्यान, सध्या हिमाचलमध्ये येणाऱ्या नैसर्गिक आपत्ती पाहता प्रशासनासह सदरील गोष्टींबाबतच्या यंत्रणाही प्रत्येक घडामोडीवर लक्ष ठेवून आहेत.