Himachal Pradesh: देशभरात पावसाचा कहर कुठे कमी झाला तोच अनेक भागांमध्ये दरडी कोसळण्याच्या घटनांचं प्रमाण वाढलं. महाराष्ट्रासह बऱ्याच ठिकाणी असं चित्र पाहायला मिळालं. त्यातच हिमाचलमधून दर दिवसाआड एक घटना सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकवत होती. इथं सुरु असणारा निसर्गाचा कोप काही केल्या थांबण्याचं नाव घेत नाहीये. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिमाचल प्रदेशातील किन्नौरमध्ये (Kinnaur District) पुन्हा एकदा मोठी दुर्घटना घडली आहे. ज्यामुळं निगुलसेरी राष्ट्रीय महामार्ग 5 वर अचानक डोंगराचा मोठा भाग (Landslide in Kinnaur) कोसळला ज्यामुळं हिमाचल रोडवेजची एक बस आणि अनेक वाहनं दरडीखाली दबली गेली. किन्नौरमध्ये एकाच महिन्याच दरड कोसळण्याची ही दुसरी मोठी घटना आहे. बुधवारी (आज) दुपारी 12 वाजून 45 मिनिटांच्या सुमारास ही घटना घडली.


45 हून अधिक लोकं बेपत्ता 
थरकाप उडवणाऱ्या या घटनेनंतर या भागात अनेकजण बेपत्ता असण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या मार्गावरुन जाणारी हिमाचल रोडवेजची बस दरडीखाली दबली असून, त्यामधील प्रवासी ढिगाऱ्याखाली दबले गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. सदर घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफच्या टीमनं घटनास्थळी धाव घेत मदतकार्य पोहोचवण्यास सुरुवात केली. इथं बचावकार्य सुरु करण्यात आलं असून, सतत डोंगरावरून कोसळणारे दगड बचावकार्याचा वेग मंदावत आहेत. दरम्यान, एएनआय या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार या ठिकाणहून 5 मृतदेह ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले आहेत. 





हरिद्वारच्या दिशेनं निघालेली बस... 
हिमाचल रस्ते परिवहन मंडळ (HRTC)ची बस रिकाँग पियो येथून हरिद्वारच्या दिशेनं निघाली होती. या बसमध्ये नेमके किती प्रवासी होते याबाबतची कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण, सुत्रांच्या हवाल्यातून मिळालेल्या माहितीनुसार बसमध्ये 40 ते 45 प्रवासी होते. त्यामुळं आता या लोकांचा शोध घेण्याचा प्रयत्न या भागात सुरु आहे.