`गोडसेपूर्वी जन्मले असते तर मीच गांधीला गोळ्या घातल्या असत्या`
अखिल भारत हिंदू महासभा नावाच्या संघटनेनं उत्तरप्रदेशच्या मेरठमध्ये पहिलं कथित `हिंदू न्यायालय` स्थापन केल्याचा दावा केलाय
मेरठ : उत्तरप्रदेशच्या मेरठ स्थित गठित पहिल्या 'हिंदू कोर्ट'ची पहिली न्यायाधीश डॉ. पूजा शकुन पाण्डेय हिनं एक वक्तव्य वादात अडकलंय. 'मी अभिमानाने सांगतेय की जर नथूराम गोडसेपूर्वी मी जन्मले असते तर मीच गांधीला गोळ्या घातल्या असत्या... मला अभिमान आहे की मी आणि माझी संघटना अखिल भारत हिंदू महासभा नथूराम गोडसेची पूजा करतात' असं पूजा पाण्डेय हिनं म्हटलंय.
गुरुवारी २३ ऑगस्ट रोजी हिंदू कोर्टची पहिली जज डॉ. पूजा पाण्डेय हिनं हे वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. पाण्डेय हिच्या म्हणण्यानुसार, गोडसेनं गांधीजींची हत्या केली नव्हती तर भारतीय संविधान लागू होण्यापूर्वी शिक्षा दिली होती... त्याचाच हा परिणाम होता. एवढ्यावरच ती थांबली नाही तर एक पिता कधीही आपल्या दोन मुलांमध्ये वाटणी करत नाही, असंही तिनं म्हटलंय.
अखिल भारत हिंदू महासभा नावाच्या संघटनेनं उत्तरप्रदेशच्या मेरठमध्ये पहिलं कथित 'हिंदू न्यायालय' स्थापन केल्याचा दावा केलाय. १५ ऑगस्टच्या मुहूर्तावर या संघटनेनं या न्यायालयाची स्थापना केलीय. हिंदू धर्माशी निगडीत प्रकरणांना निकाली लावण्याच्या उद्देशानं या न्यायालयाची स्थापना करण्यात आलीय. यामध्ये दारुल कजा म्हणजेच शरीयत कोर्टाप्रमाणेच निर्णय सुनावले जाणार आहेत आणि लोकांच्या समस्यांचं समाधान केलं जाणार आहे.