गांधींच्या पुतळ्यावर गोळ्या झाडून `शौर्य दिवस` साजरा करणाऱ्या पूजा पांडेला अटक
पूजा पांडे हिनं गांधींजींच्या पुतळ्यावर तीन गोळ्या झाडून त्याचं दहनही केलं होतं
नवी दिल्ली : महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी दिनालाच त्यांच्या पुतळ्यावर गोळ्या झाडणाऱ्या अखिल भारत हिंदू महासभेची राष्ट्रीय सचीव पूजा पांडे आणि तिचा पती अशोक पांडे यांना अलिगढ पोलिसांनी अटक केलीय. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी दोघांनाही दिल्लीतून नोएडामध्ये प्रवेश करताना अटक केली. आता दोघांनाही अलीगढला आणण्यात येणार आहे.
३० जानेवारी रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी देशभर साजरी करण्यात आली. याच दिवशी नथूराम गोडसे यानं दिल्लीच्या बिर्ला हाऊसमध्ये गांधींजींवर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली होती. हा दिवस हिंदू महासभेकडून शौर्य दिवस म्हणून साजरा केला गेला. यावेळी, पूजा पांडे हिनं गांधींजींच्या पुतळ्यावर तीन गोळ्या झाडून त्याचं दहनही केलं होतं.
अधिक वाचा :- गांधीजींच्या पुतळ्यावर गोळ्या झाडणाऱ्या पूजा पांडे विरोधात एफआयआर
पूजा पांडेचे हे फोटो समोर आल्यानंतर अलिगढ पोलिसांनी दहा जणांविरोधात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणात आत्तापर्यंत सात जणांना अटक करण्यात आलीय. पूजा आणि अशोक पांडे हे दोघे यानंतर फरार होते. आता मात्र दोघंही पोलिसांच्या तावडीत सापडलेत. या दोघांनाही न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.