पाकिस्तानातील गुरू नानक महालाची स्थानिकांकडून तोडफोड; किंमती वस्तूही लंपास
महालाचे किंमती दरवाजे, खिडक्या आणि नजाकतदार कलाकुसरीचे झरोके विकून टाकले.
लाहोर: पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात असणारा ऐतिहासिक गुरू नानक महालाची स्थानिक लोकांनी तोडफोड केल्याची माहिती समोर आली आहे. येथील अधिकाऱ्यांच्या या सगळ्याला गुप्त पाठिंबा असल्याचेही सांगितले जाते. एवढेच नव्हे तर या महालाचा काही भाग पाडल्यानंतर लोकांनी तेथील किंमती वस्तू परस्पर विकूनही टाकल्या.
'डॉन' वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, या चार मजली महालात गुरू नानक आणि हिंदू राजांच्या अनेक तसबिरी होत्या. तब्बल ४०० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या या महालात एकूण १६ खोल्या होत्या. प्रत्येक खोलीत तीन दरवाजे आणि चार खिडक्या होत्या. लाहोरपासून १०० किलोमीटवर असणाऱ्या नारोवाल शहरात हा महाल आहे. हा महाल पाहण्यासाठी जगभरातून अनेक लोक नारोवालमध्ये येत असत.
सूत्रांच्या माहितीनुसार, स्थानिक प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या मूक संमतीनेच या महालाचा मोठा भाग पाडण्यात आला. यानंतर महालाचे किंमती दरवाजे, खिडक्या आणि नजाकतदार कलाकुसरीचे झरोके विकून टाकले. मात्र, तरीही येथील अधिकाऱ्यांनी आपल्याला याबाबत काहीही माहिती नसल्याचे सांगितले.
स्थानिक नागरिक मोहम्मद असलम यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही इमारत बाबा गुरु नानक महाल म्हणून ओळखली जायची. आम्ही त्याला महाल म्हणायला सुरुवात केली. हा महाल पाहण्यासाठी जगभरातून अनेक लोक याठिकाणी येत असत. मात्र, काही प्रभावशाली स्थानिक लोकांनी या महालाची तोडफोड सुरु केली आहे. परंतु, स्थानिक प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले.