मुंबई : सिंधिया म्हणजे मध्य प्रदेशातलं मोठं प्रस्थ. एकाच घरात कट्टर भाजपची असलेली आई आणि काँग्रेसशी एकनिष्ठ असलेला मुलगा आणि मग त्यांच्यात झालेला वाद. सिंधियांच्या या घराण्याला ऐश्वर्याचे, राजकारणाचे, वादाचे अनेक पदर आहेत. आज नातू आजीच्या पावलावर पाऊल ठेवतोय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिंदीया हे मूळचे सातारचे शिंदे. पराक्रमी महादजी शिंदेंचं हे घराणं. पण ते ग्वालेरला स्थायिक झाले आणि इंग्रजांनी शिंदेंचे सिंदिया केलं. तब्बल २७ वेळा खासदार निवडून दिलेलं हे भारतातलं एकमेव राजघराणं. ग्वालेरचे हे राजे.


स्वातंत्र्यानंतर वेगवेगळ्या राज्यांच्या निर्मितीदरम्यान ग्वालेरचे राजे जिवाजीराव सिंदियांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तेव्हापासूनच जिवाजीरावांनी काँग्रेसमध्ये यावं, म्हणून काँग्रेसनं पायघड्या घातल्या, पण जिवाजीराव राजकारणापासून दूर राहिले.


जिवाजीरावांच्या पत्नी राजमाता विजयाराजे सिंदिया बऱीच मनधरणी केल्यावर १९५७ मध्ये काँग्रेसच्या तिकीटावर गुनामधून लोकसभा निवडणूक लढल्या आणि जिंकल्या. मात्र नंतर विजयाराजे भाजपवासी झाल्या. त्या जनसंघाच्या संस्थापक सदस्य.


आईच्या पावलावर पाऊल ठेवत माधवराजे सिंदिया १९७१ मध्ये जनसंघाच्या तिकीटावर निवडून आले. नंतर मात्र माधवरावांनी जनसंघाशी फारकत घेतली. सिंदिया कुटुंबात पहिला राजकीय संघर्ष झाला तो १९८० मध्ये.


रायबरेलीमधून इंदिरा गांधींविरोधात भाजप विजयाराजेंना उतवरण्याच्या तयारीत होती. त्याचवेळी संजय गांधी आणि माधवरावांची घट्ट मैत्री झाली होती. इंदिरा गांधींविरोधात लढू नये म्हणून माधवरावांनी आईला गळ घातली. पण आईनं मुलाचा हट्ट पुरवला नाही. त्याच वर्षी आईचा भाजपच्या तिकिटावर पराभव झाला आणि मुलगा काँग्रेसच्या तिकीटावर विजयी झाला.


आई आणि मुलाचं नातं राजकारणानं कलुषित केलं. एवढं की विजयाराजेंनी त्यांच्या संपत्तीतून माधवराव सिंदियांना बेदखल केलं. एवढंच नव्हे तर त्यांच्या अंत्यविधीचा अधिकारही मुलाला देऊ नये, असं त्यांनी मृत्यूपत्रात म्हटलं होतं. पण ही कटुता पुढच्या पिढ्यांनी फार ताणली नाही.


पुढे १९८० मध्ये जनता पार्टीपासून भाजप वेगळी झाली आणि विजयाराजे भाजपच्या उपाध्यक्ष झाल्या. माधवरावांची बहीण वसुंधरा राजे आणि यशोधरा राजे मात्र आईसारख्या भाजपवासी झाल्या.वसुंधरा राजेंनी दोन वेळा राजस्थानचं मुख्यमंत्रिपद भूषवलं. सध्या दोघीही राजस्थानात आमदार आहेत.


माधवराव सिंदियांचा ३० सप्टेंबर २००१ ला विमान अपघातात मृत्यू झाला आणि त्यांचा मुलगा ज्योतिरादित्य सिंदियांची राजकारणात अचानक एन्ट्री झाली. २००२ पासून २०१९ पर्यंत सलग ते खासदार राहिले. दोन वेळा त्यांनी केंद्रीय मंत्रिपदही भूषवलं. २०१९ मध्ये मात्र ज्योतिरादित्य पहिल्यांदा पराभूत झाले.


आई आणि तिच्या दोन मुली भाजपमध्ये, मुलगा काँग्रेसमध्ये असं हे राजघराणं. मात्र सिंदिया कधीच एकमेकांविरोधात निवडणूक लढले नाहीत. आता ज्योतिरआदित्य पुन्हा भाजपवासी होण्याच्या तयारीत आहेत. जवळपास पन्नास वर्षांनंतर एक वर्तुळ पूर्ण होतंय.