अंबानींकडून सर्वाधिक पगार घेणारा कर्मचारी, नेमकं काय करतात हितल मेस्वानी?
Hital Meswani Success Story: हितल हे मुकेश अंबानी आणि अंबानी परिवाराच्या अत्यंत जवळचे मानले जातात.
Hital Meswani Success Story: मुकेश अंबानी हे देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. फोर्ब्सच्या माहितीनुसार त्यांचे नेटवर्थ 930602 कोटी रुपये आहे. देशातील महत्वाची कंपनी असलेल्या रिलायन्स कंपनीचे ते प्रमुख आहेत. रिलायन्सचे नेटवर्थ 1918000 कोटी रुपये इतके आहे. मुकेश अंबानींचा रिलायन्स ग्रुप हा विविध व्यवसायांमध्ये गुंतलाय. इशा अंबानी, आकाश अंबानी, अनंत अंबानी, आनंद जैन, मनोज मोदी हे या विविध व्यवसायांचे प्रमुख आहेत. नुकतेच रिलायन्स ग्रुपच्या जामनगरच्या ऑईल रिफायनरी प्लांटची देशभरात चर्चा झाली. जामनगर रिफायनरीमागील प्रमुख व्यक्ती कोण आहे तुम्हाला माहिती आहे का? ही व्यक्ती त्याच्या पगाराबद्दल देशभरात चर्चेत असते. हितल मेस्वानी असे या व्यक्तीचे नाव आहे. हितल हे मुकेश अंबानी आणि अंबानी परिवाराच्या अत्यंत जवळचे मानले जातात.
सर्वाधिक पगार घेणारे कर्मचारी
हितल हे अंबानींचे प्रमुख सहकारी आहेत आणि ते रिलायन्सचे सर्वाधिक पगार घेणारे कर्मचारी आहेत. मुकेश अंबानी यांचा पहिला बॉस रसिकभाई मेसवानी होते. हितल मेसवानी त्यांचे पुत्र आहेत. रिलायन्स इंडस्ट्री हितल मेस्वानींना 24 कोटी रुपये इतका पगार देते. त्यामुळे ते देशातील सर्वाधिक पगार घेणाऱ्यांच्या यादीतही शीर्षस्थानी आहेत.
कोण आहेत हितल मेस्वानी?
अंबानी ज्या व्यक्तीला 24 कोटी रुपये इतका पगार देतात. यावरुन ते रिलायन्स ग्रुपसाठी किती महत्वाचे असतील याचा अंदाज आपण बांधू शकतो. रिलायन्सच्या अनेक महत्वाच्या प्रोजेक्टमध्ये हितल यांचा मोलाचा सहभाग असतो. रिलायन्सचा हजिरा पेट्रोकेमिकल्स आणि जामनगर रिफायनरी कॉम्प्लेक्स प्रोजेक्ट यशस्वी झाला. देशासह जगभरात याची चर्चा झाली. पण हा प्रकल्प पूर्णत्वास येण्यामागे हितल मेस्वानी यांचा हात असल्याचे सांगितले जाते.
किती शिकलेयत हितल मेस्वानी?
हितल मेसवानी 1990 मध्ये रिलायन्समध्ये सामील झाले आणि 1995 पासून ते रिलायन्सच्या संचालक मंडळावर आहेत. हितल यांनी आपले शिक्षण अमेरिकेतील पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातून (UPenn) पूर्ण केले. येथे त्यांनी व्यवस्थापन आणि तंत्रज्ञान विषयातील पदवी मिळवली. तसेच स्कूल ऑफ इंजिनीअरिंग अँड अप्लाइड सायन्सेस, UPenn मधून त्यांनी केमिकल इंजिनीअरिंग केले. तसेच व्हार्टन बिझनेस स्कूलमधून त्यांनी अर्थशास्त्रातील विज्ञान पदवी प्राप्त केली. त्यामुळे एक उच्चशिक्षित व्यक्ती रिलायन्सच्या यशामागे आहे, हे यातून सिद्ध होते.
हितल मेस्वानी आणि अंबानी परिवाराचे नाते तसे जुने आहे. धीरुभाई अंबानी यांच्यापासून मेस्वानी आणि अंबानी परिवार एकत्र काम करतोय. हितल मेस्वानी यांचे वडील रसिकलाल मेस्वानी आणि धीरुभाई अंबानी हे व्यावसायिक मित्र. रसिकलाल मेस्वानी हेदेखील धीरुभाई अंबानी यांच्याप्रमाणेच हुशार आणि मेहनती होते. धीरुभाई यांनी शून्यातून रिलायन्सचे विश्व निर्माण केले हे साऱ्या जगाला माहिती आहे. यानंतर मुकेश अंबानी यांनीदेखील कर्तृत्ववान बनावे, अशी त्यांची इच्छा होती. मुकेश अंबानी यांना मार्गदर्शन करण्यासाठी धीरुभाईंनी रसिकलाल यांची निवड केली. त्यामुळे रसिकलाल हे मुकेश अंबानी यांचे पहिले बॉस ठरले.