संसदेत एकदा दोन हात होऊनच जाऊ देत, अमित शाहांचे विरोधकांना जाहीर आव्हान
गलवान खोऱ्यातील भारत-चीन संघर्षानंतर काँग्रेसकडून मोदी सरकारला सातत्याने धारेवर धरले जात आहे.
नवी दिल्ली: भारत-चीन प्रश्नावर चर्चा करायची असेल तर आम्ही घाबरत नाही. १९६२ पासून काय काय घडले यावर संसदेत एकदा दोन हात होऊनच जाऊ दे, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी काँग्रेससह विरोधकांना आव्हान दिले. ते रविवारी 'एएनआय' वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.
गलवान खोऱ्यातील भारत-चीन संघर्षानंतर काँग्रेसकडून मोदी सरकारला सातत्याने धारेवर धरले जात आहे. चीनविषयक मोदी सरकारच्या धोरणांवर काँग्रेसकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. राहुल गांधी यांनी तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 'सरेंडर मोदी', असे संबोधले होते.
'दुश्मनाशी लढताना घरातल्या लोकांनी एक राहायचं असतं, हे काँग्रेसला कळत नाही का?'
या सगळ्या टीकेला अमित शाह यांनी तितक्याच चोखपणे प्रत्युत्तर दिले आहे. 'एएनआय'ला दिलेल्या मुलाखतीत शहा यांनी म्हटले की, भारत-चीन प्रश्नावर चर्चा करायची असेल तर करुयात. १९६२ पासून काय काय घडले, यावर संसदेत एकदा दोन दोन हात होऊनच जाऊ देत. कोणीही चर्चेला घाबरत नाही. मात्र, जेव्हा सीमेवर देशाचे जवान संघर्ष करत आहेत किंवा सरकारने एखादी ठोस भूमिका घेतली असताना पाकिस्तान किंवा चीनला आनंद होईल, अशी वक्तव्य करणे योग्य नसल्याचे अमित शाह यांनी सांगितले.
मोदींवर टीका करताना राहुल गांधींची स्पेलिंग मिस्टेक; नेटकरी म्हणतात...
काय म्हणाले होते राहुल गांधी?
गलवान खोऱ्यातील भारत-चीन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ट्विटरवरून उपरोधिक निशाणा साधला होता. या ट्विटमध्ये राहुल गांधी यांनी त्यांचा उल्लेख सरेंडर मोदी Surender Modi असा केला होता.