केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुरुवारी लोकसभेत जम्मू काश्मीरशी संबंधित दोन विधेयकांवर चर्चा केली. दरम्यान यावेळी अमित शाह यांनी काँग्रेसला लक्ष्य केलं. जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवणं काही लोकांना खटकलं असा टोला अमित शाह यांनी यावेळी लगावला. जम्मू आणि काश्मीर आरक्षण विधेयक लोकसभेत मंजूर झालं आहे. दरम्यान अमित शाह यांनी यावेळी दिवंगत माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्यामुळेच पाकिस्तानव्याप्त काश्मीरचा मुद्दा निर्माण झाल्याचा आरोप केला. यानंतर काँग्रेसच्या अनेक खासदारांनी सभात्याग केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"पाकिस्तानव्याप्त काश्मीरची समस्या पंडित जवाहरलाल नेहरु यांच्यामुळेच निर्माण झाली आहे. अन्यथा तो भाग काश्मीरमध्ये असतात. पंडित नेहरुच पाकिस्तानव्याप्त काश्मीरसाठी जबाबदार आहेत," असं अमित शाह म्हणाले. "पंडित नेहरुंनी ही माझी चूक असल्याचं सांगितलं होतं. पण ही चूक नव्हती. देशाची इतकी मोठी जमीन गमावणं ही घोडचूक होती," अशी टीका अमित शाह यांनी केली.


अमित शाह यांच्या मते नेहरुंनी केलेल्या दोन चुकांमुळे जम्मू काश्मीरला भोगावं लागत आहे. युद्धविरामाची घोषणा करणं आणि काश्मीरचा मुद्दा संयुक्त राष्ट्राकडे नेणं या दोन चुका असल्याचं अमित शाह म्हणाले आहेत. ते म्हणाले की, "जर पंडित नेहरुंनी तीन दिवसांनी युद्धविरामाची घोषणा केली असती तर आज पाकिस्तानव्याप्त काश्मीर भारताचा भाग असता. दुसरं म्हणजे त्यांनी हा मुद्दा संयुक्त राष्ट्राकडे नेला".


पाकिस्तानव्याप्त काश्मीर आपलाच आहे असं सांगताना अमित शाह यांनी तिथे 24 जागा आरक्षित असल्याचा उल्लेख केला. "याआधी जम्मूत 37 सीट्स होत्या, आता 43 आहेत. याआधी काश्मीरमध्ये 46 होत्या, आता 47 आहेत आणि पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये 24 जागा आपल्यासाठी राखीव आहेत," असं अमित शाह म्हणाले आहेत.