Maharashtra-Karnatak Border Issue : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्या उपस्थितीत दिल्लीत (Delhi) बैठक पार पडली.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basawaraj Bommai) हे या बैठकीला हजर होते. 20 ते 25 मिनिटात ही बैठक संपली. गेल्या काही दिवसात महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावादाचा प्रश्न (Maharashtra-Karnatak Border Dispute) चिघळला होता. महाराष्ट्रातून जाणाऱ्या काही गाड्यांवर कर्नाटक सीमाभागात कन्नड वेदिकेच्या (Kannada Vedika) कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता. त्यामुळे गृहमंत्री अमित शहा यांना यात हस्तक्षेप करावा लागला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमित शहा यांचं वक्तव्य
बैठक संपल्यानंतर गृहमंत्री अमित शहा यांनी मीडियासमोर या बैठकीबाबतची माहिती दिली. महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात सीमावाद निर्माण झाला होता. याप्रश्नावर आज महाराष्ट्र आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा केली. दोन्ही नेत्यांबरोबर चांगल्या वातावरणात चर्चा झाली. दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. सीमावादावर संविधान मार्गाने तोडगा काढला जाईल. सीमावादावर सुप्रीम कोर्टाचा निर्णय येत नाही तोपर्यंत कोणतंही राज्य दावा करणार नाही तसंच दोन्ही राज्यातील प्रत्येकी तीन मंत्र्यांची समिती यासाठी गठीत करण्यात आल्याची माहिती अमित शहा यांनी दिली. ही समिती याप्रकरणी सखोल अभ्यास करेल. इतर लहान-सहान प्रश्नही शेजारील राज्यांमधील असतात, ही समिती या प्रश्नांवरही चर्चा करेल. 


'कायदा-सुव्यस्थेचा राखा'
दोन्ही राज्यात कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती सुरळीत रहावी, दोन्ही राज्यातील नागरिक, प्रवासी आणि व्यापाऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी सीनिअर IPS अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यावर दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी सहमती दर्शवली असून ही समिती कायदा-सुव्यवस्था सुरळीत राखण्याचं काम करेल अशी माहितीही अमित शहा यांनी दिली. दोन्ही राज्यातील वातावरण दुषित करण्यामागे फेक ट्विटरचा वापर करण्यात आल्याचं समोर आलं आहे. मोठ्या नेत्यांच्या नावाने काही फेक ट्विटर तयार करण्यात आले आणि ते समाजमाध्यमांवर पसरवण्यात आले. त्यामुळे दोन्ही राज्यातील वातावरण दुषित झालं. ज्या ज्या ठिकाणी अशा फेक ट्विटरची प्रकरणं समोर आली आहेत, त्या ठिकाणी गुन्हा नोंदवला जाईल, आणि ज्यांनी हे प्रकार केले आहेत, त्यांना जनतेसमोर उघडं पाडलं जाईल असा इशाराही अमित शहा यांनी दिला.


अमित शहांचं विरोधकांना आवाहन
याबरोबरच अमित शहा यांनी दोन्ही राज्यातील विरोधकांनाही आवाहन केलं. विरोधकांनी हा मुद्दा राजकीय बनवून नये, उद्धव ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने याप्रकरणी सहयोग दाखवावा, या मुद्द्याला राजकीय रंग देऊन नये असं आवाहन अमित शहा यांनी केलं.