`नेहरुंच्या प्रेमामुळे भारताचा...`; तवांगमधील संघर्षांनंतर गृहमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया
Tawang clash : अरुणाचल प्रदेशातील तवांग सेक्टरमध्ये भारतीय आणि चिनी सैन्यामध्ये झालेल्या चकमकीचे अनेक राजकीय अर्थही काढले जात आहेत.
Tawang clash : अरुणाचल प्रदेशातील (arunachal pradesh) तवांग सेक्टरमध्ये 9 डिसेंबर रोजी भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये चकमक झाली आहे (India China Conflict). केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (rajnath singh) यांनी संसदेत बोलताना याबाबत माहिती दिली आहे. या चकमकीत दोन्ही बाजूचे जवान जखमी झाले आहेत. जखमी झालेल्या भारतीय सैनिकांनी गुवाहाटी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर दुसरीकडे भारतीय सैनिकांपेक्षा चिनी सैनिक मोठ्या प्रमाणात जखमी झाल्याची माहिती एएनआयने दिलीय. त्यानंतर देशाचे गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी माध्यमांशी बोलताना याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी अमित शाह यांनी कॉंग्रेसवर जोरदार टीका केली आहे.
चीनने पूर्ण अरुणाचलवर दावा केला तेव्हा कॉंग्रेसने त्याचा शोध घेतला होता का?
"1992 मध्ये चीनने भारताची हजारो किलोमीटर जमीन ताब्यात घेतली तेव्हा कॉंग्रेसने याचा शोध घेतला होता का? नेहरुंच्या प्रेमामुळे सुरक्षा परिषदेत भारताच्या स्थायी सदस्यतेचा बळी दिला गेला, हे शोधातून समोर आलय. या विषयाचा त्यांनी शोध घेतला होता का? ज्यावेळी आपले सैनिक गलवानमध्ये चिनी सैनिकांसोबत लढत होते तेव्हा चिनी दूतावासातील अधिकाऱ्यांना कोण सांगत होते याचा कॉंग्रेसने शोध घेतला का? 2006 मध्ये चीनने पूर्ण अरुणाचलवर दावा केला होता तेव्हा त्यांच्या शोधाचा तो विषय होता का? 2007 मध्ये कॉंग्रेसच्या मुख्यमंत्र्यांना चीनने व्हिसा देण्यास नकार दिला होता याचा त्यांनी शोध घेतला का?," असे अनेक सवाल गृहमंत्री अमित शाह यांनी केला आहे.
हे ही वाचा >> गुजरातची निवडणूक होईपर्यंत चीनचं सैन्य वाट पाहत होतं का?
"तुमच्या दुहेरी भूमिका जनतेसमोर चालत नाहीत. तुमच्या कुटुंबाकडून चालवण्यात येणाऱ्या फाऊंडेशनला चीनच्या दूतावासाकडून अनुदान मिळालं आहे. तुमच्याच काळात हजारो किलोमीटर जमीन चीनकडे गेलीय," असा आरोप अमित शाह यांनी केलाय.
India China Conflict : चीनची तवांगवर वक्रदृष्टी; असं या भागात आहे तरी काय? पहिल्यांदाच खुलासा
भारतीय सैन्याचे कौतुक
"भारताच्या एक इंच जमिनीवर कोणीही ताबा मिळवलेला नाही आणि असे कोणी करुही शकत नाही. 8 डिसेंबरच्या रात्री आणि 9 डिसेंबरच्या सकाळी आपल्या सैनिकांनी भारतीय सीमेमध्ये घुसलेल्या चिनी सैनिकांना बाहेर काढले. आमच्या जवानांनी दाखवलेल्या शौर्याचे मी कौतुक करतो," असे अमित शाह म्हणाले.