India China Conflict : तवांगवर ताबा मिळवण्यासाठी चीन देणार युद्धाची हाक, इथं असं दडलंय तरी काय?

India China Conflict : अरुणाचल प्रदेशातील (Arunachal Pradesh) तवांग सेक्टरमध्ये भारत आणि चीन यांच्यात झालेल्या चकमकीत दोन्ही बाजूचे जवान जखमी झाले आहेत. जखमी झालेल्या भारतीय सैनिकांनी गुवाहाटी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे

Updated: Dec 13, 2022, 09:42 AM IST
India China Conflict : तवांगवर ताबा मिळवण्यासाठी चीन देणार युद्धाची हाक, इथं असं दडलंय तरी काय? title=
(फोटो सौजन्य - PTI)

India China Conflict : गलवान संघर्षानंतर चीनने पुन्हा एकदा भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केलाय. यावेळी अरुणाचल प्रदेशातील (Arunachal Pradesh) तवांग सेक्टरमध्ये भारत आणि चीन यांच्यात झालेल्या चकमकीत दोन्ही बाजूचे जवान जखमी झाले आहेत. जखमी झालेल्या भारतीय सैनिकांनी गुवाहाटी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर दुसरीकडे भारतीय सैनिकांपेक्षा चिनी सैनिक मोठ्या प्रमाणात जखमी झाल्याची माहिती एएनआयने दिलीय.

भारतीय सैन्याने काय म्हटलं?

ही माहिती समोर आल्यानंतर भारतीय सैन्याने प्रतिक्रिया दिलीय. अरुणाचल प्रदेशातील तवांग (China) सेक्टरमध्ये प्रत्यक्ष निरीक्षण रेषेच्या जवळच्या भागाबाबत वेगवेगळे दावे करण्यात येतायत. त्यामुळे दोन्ही बाजूचे सैन्य आपापल्या दाव्यानुसार गस्त घालते आणि हे 2006 पासून सुरू आहे. 9 डिसेंबर रोजी भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये चकमक झाली. यामध्ये दोन्ही बाजूच्या सैनिकांना जखमा झाल्या आहेत. चकमकीनंतर दोन्ही बाजूचे सैनिक मागे गेले. त्यानंतर भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांनी शांतता कायम राहावी यासाठी  चिनी अधिकाऱ्यांसोबत फ्लॅग मिटींग घेतली.

पण चीनची तवांगवर नजर का आहे?

तवांगजवळील यांगत्से येथे हा सर्व प्रकार घडलाय. तवांगमध्ये 17,000 फूट उंचीवर असलेल्या यांगत्से या भागावर चीनचा 1962 च्या युद्धापासून डोळा आहे. तेव्हापासूनच चीन यांगत्से काबीज करण्याचे स्वप्न पाहत आहे. लष्कराच्या सूत्रांनुसार, चीनची पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) नेहमीच यांगत्सेला लक्ष्य करायच्या तयारीत असते.

भारतात इंग्रजांचे राज्य असताना सीमेवर असलेल्या मॅकमोहन लाईनवरुन चीन मूग गिळून गप्प बसला होता. पण 1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि चीनने आपले खरे रंग दाखवायला सुरुवात केली. भारताच्या अरुणाच प्रदेशला चीन नेहमीच दक्षिण तिबेटचा भाग असल्याचे सांगत आलाय. मात्र इतिहासात असा कोणताही पुरावा नाहीये की अरुणाच प्रदेश तिबेटचा भाग आहे.

चीनला यांगत्से का हवंय?

तवांगपासून 35 किलोमीटरवर असलेल्या उत्तर पूर्व दिशेला यांगत्से आहे. यांगत्सेचा बराचसा भाग हा मार्च महिन्यापर्यंत बर्फाच्छदित असतो. भारतासाठी यांगत्से जितका महत्त्वाचा आहे तितकाच चीनसाठीसुद्धा आहे. यांगत्सेवरुन चीन थेट तिबेटवर लक्ष ठेवू शकतो. यासोबत चीन प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळही हेरगिरी करु शकतो.

1962 चे युद्ध आणि तवांगवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न

1962 मध्ये झालेल्या भारत चीन युद्धात चीनने तवांगवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला होता. माध्यमांच्या वृत्तानुसार या युद्धात 800 भारतीय सैनिक शहीद झाले होते. 1000 सैनिकांना चीनने बंदी बनवले होते. गेल्या 10 वर्षांपासून चीन सीमेवरील भागात मोठ्या प्रमाणात विकासकामे करत आहे. महत्त्वाचे भाग म्हणजे यामध्ये युद्धासाठी असलेल्या गोष्टींचाही समावेश आहे आणि हे सर्व तवांग सीमेजवळ सुरुय.