नवी दिल्ली : गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी पुलवामातल्या हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली. बडगाममध्ये सर्व हुतात्म्यांचे पार्थिव ठेवण्यात आले होते. राजनाथ सिंह यांच्यासह सीआरपीएफचे वरिष्ठ अधिकारी, लष्कराचे उत्तर कमांडचे प्रमुख तसंच विविध लष्करी आणि मुलकी अधिकारी उपस्थित होते. शहिदांना मानवंदना दिल्यानंतर शहिदांचे पार्थिव दिल्लीकडे रवाना झाले आहेत. यावेळी गृहमंत्र्यांनी स्वतः पार्थिवांना खांदा दिला. पुलवामा इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ४४ जवानांना हौतात्म्य आलं. या हल्ल्याने अनेक संसार उध्वस्त केले. अनेक स्वप्न एका क्षणात नष्ट झाली. देशाच्या रक्षणासाठी निघालेले तरूण सैनिक अवघ्या काही सेकंदाच हुतात्मा झाले. कोणाच्या घरी वृद्ध माता पिता आपल्या मुलाची वाट पाहात होते, कोणाची पत्नी पतीच्या वाटेकडे डोळे लावून बसली होती, काही सैनिकांनी तर आपल्या नवजात बाळाचा चेहराही पाहिला नव्हता. मात्र देशरक्षणासाठी तळहातावर शीर घेऊन हे वीर निघाले आणि हुतात्मे झाले. 



शत्रूही एवढा भ्याड की आमच्या शूरवीर जवानांशी थेट समोरासमोर लढण्याची हिंमतही दाखवली नाही. स्फोटकांनी खचाखच भरलेली गाडी या जवानांच्या बसवर आदळवण्याचा भ्याडपणा दहशतवाद्यांनी दाखवला. या हुतात्म्यांची पार्थिव आता तिरंगा अभिमानाने लेवून आपल्या घराकडे निघाली आहेत. आज सर्व देश त्यांना सलाम करतोय. पाणावलेल्या डोळ्यात राग, क्रोध, संताप आहे. आता देशाला हवा आहे बदला. जवान हुतात्मा झाले आणि अमर झाले. पण आता हे बलिदान व्यर्थ न जाऊ देण्याची जबाबदारी या देशाची आहे. भ्याड हल्ला करणाऱ्यांना कठोर शिक्षा देणं, दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशाला जन्माची अद्दल घडवण्याची वेळ आली आहे. प्रत्येक देशवासीय या शहीद शूरजवानांचं हौताम्य विरसणार नाही.