Honey Bees Attack on Woman: मधमाशांचा (Honey Bee) पोळा दिसला तर आपण त्याच्या जवळ जाणं टाळतो. मधमाशांच्या पोळाला धक्का बसला आणि जर त्यांना हल्ला केला तर तुम्ही जीव गमावू शकता. त्यामुळे जीव धोक्यात घालणाऱ्या या संकटापासून दूर राहणंच आपण पसंत करतो. दरम्यान उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) एक महिला मात्र मधमाशांपासून आपल्याला वाचवू शकली नाही आणि आपला जीव गमावला. जवळपास अर्धा तास मधमाशा महिलेवर हल्ला करत होत्या. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला. 


नेमकं काय झालं? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तर प्रदेशातील एक महिला आपल्या बहिणीच्या मुलीच्या लग्नासाठी रिक्षातून निघाली होती. रिक्षा खसरौल येथे पोहोचली असता मधमाशांनी अचानक रिक्षावर हल्ला केला. कोणालाही काही कळायच्या आत मधमाशा रिक्षातील सर्व प्रवाशांवर तुटून पडल्या होत्या. यादरम्यान रिक्षातील चार प्रवासी पळून जाण्यात यशस्वी ठरले. मात्र पुष्पा नावाची महिला मधमाशांच्या भक्ष्यस्थानी पडली. मधमाशांनी केलेल्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाला. 


जवळपास अर्धा तास मधमाशांनी हैदोस घातला. मधमाशांच्या हल्ल्यामुळे तेथील स्थानिकही प्रचंड घाबरले होते. यामुळे जवळपास अर्धा तास रस्ता बंद होता. कोणतीही माणसं, वाहनं त्या रस्त्याने प्रवास करत नव्हती. 


मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला 55 वर्षीय होती. पुष्पा नाव असणारी महिला आपल्या भाचीच्या लग्नात सहभागी होण्यासाठी ई-रिक्षाने चालली होती. पण रस्त्यात आपल्याला मृत्यू गाठेल याची तिची कल्पनाही नव्हती. जवळपास अर्धात तास मधमाशा पुष्पा यांच्यावर हल्ला करत त्यांच्या शरिराचे लचके तोडत होत्या. रिक्षामधील इतरांनी पळ काढल्याने त्यांचा जीव मात्र वाचला. 


घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस दाखल झाले होते. त्यांनी तात्काळ कुटुंबाशी संपर्क साधत घटनेची माहिती दिली. मृतदेह पाहिल्यानंतर पोलिसांनाही धक्का बसला होता. दरम्यान पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.