जेलमध्ये राम रहीम आरामात... बाहेरून येतं खास जेवण
बलात्काराच्या आरोपाखाली दोषी असलेला बाबा गुरमीत राम रहीमची जेलमधील माहिती समोर आली आहे.
मुंबई : बलात्काराच्या आरोपाखाली दोषी असलेला बाबा गुरमीत राम रहीमची जेलमधील माहिती समोर आली आहे.
राम रहीम जेलमध्ये कोणतेही काम करत नाही. तसेच बाबाला जेलमध्ये स्पेशल ट्रीटमेंट मिळत असल्याचे सांगितले आहे. त्याचप्रमाणे बाबाला जेलच्या गाडीतून बाहेरच जेवण येत असल्याचे देखील समोर आले आहे. बाबाला जेवण देण्याअगोदर ते जेवण स्वतः जेलर खावून बघत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
जेलमधून बाहेर आलेल्या राहुल जैनने दिलेल्या माहितीनुसार, ज्या दिवशी बाबा जेलमध्ये आला तेव्हा इतर कैदी हैराण झाले. जेलमध्ये आल्यापासून राम रहीम कोणतेच काम करत नाही. मात्र जेल प्रशासनाकडून म्हटले जाते की, त्याला काम दिले जाते. गुरमीत जेलमध्ये आल्यानंतर एका कैद्याला दुसऱ्या कैद्याला भेटू देखील दिलं जात नाही. जेल प्रशासन राम रहीमला एक कायदा आणि इतर कैद्यांना दुसरा कायदा लावत आहे. दुसऱ्या कैद्यांना नातेवाईकांशी भेटण्यासाठी अवघ्या २० मिनिटांची वेळ असते तर तिथे बाबाच्या लोकांना तासन् तास भेटण्याची मुभा आहे.
राम रहीम ज्या दिवशी जेलमध्ये आला त्या दिवशी इतर कैद्यांना बंद करण्यात आलं. तसेच कैद्यांना रोज भेटण्यासाठी मिळणारा कालावधी रद्द करण्यात आला. त्याचप्रमाणे कैद्यांना वाचायला मिळणारे वर्तमानपत्र जप्त करून त्यातील बाबा राम रहीमच्या बातम्या काढून टाकण्यात आल्या. त्यामुळे बाबाला सुरूवातीपासूनच खास ट्रिटमेंट देण्यात आली.